अवकाळीचा रबीला फटका

By Admin | Published: January 2, 2015 12:43 AM2015-01-02T00:43:39+5:302015-01-02T00:52:24+5:30

औरंगाबाद : आठवडाभरापासून थंडीची लाट अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यास बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी पावसाने दणका दिला.

The Rabi hit | अवकाळीचा रबीला फटका

अवकाळीचा रबीला फटका

googlenewsNext

औरंगाबाद : आठवडाभरापासून थंडीची लाट अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यास बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी पावसाने दणका दिला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात रबी ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वातावरण असेच राहिले तर ज्वारीचे दाणे भरण्याची प्रक्रियाही थांबणार आहे. दुष्काळामुळे आधीच खरीप हातचे गेले. आता पावसामुळे रबीलाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून थंडीची तीव्र लाट आली आहे. त्यातच बुधवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वैजापूर आणि गंगापूर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत बुधवारी रात्री पाऊस झाला. त्यानंतर आज गुरुवारीही पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. शहरात सकाळच्या वेळी कधी ऊन तर कधी पाऊस, असा खेळ बघायला मिळाला. पावसामुळे आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत होते. आधीच दुष्काळामुळे खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर आता या बदललेल्या वातावरणाचा रबी पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारीची पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू आणि हरभरा ही पिके आहेत. अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकावर चिकटा पडण्याची शक्यता आहे. हरभरा पिकाला मात्र, या पावसामुळे काहीसा फायदाच होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी सतीश शिरडकर यांनी सांगितले. पावसाचा जोर कमी असल्यामुळे आणि वारा नसल्यामुळे गव्हाचे मात्र नुकसान झालेले नाही, असेही शिरडकर म्हणाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते यांनीही ज्वारीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण आणखी एक-दोन दिवस राहिले तर ज्वारीचे मोठे नुकसान होऊ शकेल. ज्वारीवर कीड वाढेल. शिवाय दाणे भरण्याची प्रक्रियाही थांबू शकते. त्यामुळे हे ढगाळ वातावरण जाऊन आभाळ स्वच्छ होणे गरजेचे आहे.

Web Title: The Rabi hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.