गारपीट, अवकाळी पावसाने मराठवाड्यातील ३३२ गावांत रबी हंगामाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 01:23 PM2021-02-22T13:23:00+5:302021-02-22T13:24:04+5:30
जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून ४३ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५ तालुक्यांतील ३३२ गावांतील रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार विभागातील जालना, परभणी आणि औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. विभागात ८ हजार ५०० गावे आहेत. त्यातील २९४ गावांना गारपिटीने झोडपले. सर्व जिल्ह्यांत मिळून सरासरीच्या तुलनेत ३० मि.मी.च्या आसपास अवकाळी पाऊस झाला. यात ३ व्यक्तींचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले. २७ लहान आणि २१ मोठे जनावरे दगावली.
जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून ४३ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ५ तालुक्यांत १३४ गावांत नुकसान झाले. ३८ हजार २४५ हेक्टरवरील पिके गारपिटीने आडवी केली. जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावांतील ५६८ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील १ तालुक्यांतील ३८ गावांतील २१५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर, नांदेडमध्ये, हिंगोलीत काही नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३३४९ हेक्टरवरील तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १२२१ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
१६ हजार क्षेत्रफळ अतिबाधित
३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान १६ हजार हेक्टरवर झाले आहे. यात सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १४४५८ हेक्टर, जालन्यातील ५६८ हेक्टर तर ११०३ हेक्टरवरील पिके बीड जिल्ह्यातील वाया गेली आहेत. उस्मानाबादमधील १३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.