विजेच्या समस्येमुळे रबी हंगाम धोक्यात
By Admin | Published: January 1, 2017 11:53 PM2017-01-01T23:53:36+5:302017-01-01T23:56:17+5:30
राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे.
राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे. परिणारमी या ३३ केव्हीमधून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या वाढल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. वीज जोडणीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
राणीउंचेगाव येथील ३३ केव्हीच्या उपकेंद्राला अंबड येथील १३२ केव्ही मधून वीज पुरवठा होत आहे. परंतु अंबड १३२ केव्हीमधून गोलापांगरी, शेवगा आणि हिस्वन अशा तीन ३३ केव्हीला वीज पुरवठा होऊन शेवटी राणीउंचेगाव ३३ केव्हीला वीजपुरवठा होत असल्याने या ३३ केव्हीला विजेचा पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. यामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. शेतीचे कृषीपंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे चालत नाही. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत असल्याने रबी हंगााम धोक्यात आला आहे.
राणीउंचेगाव ३३ केव्ही अंतर्गत परिसरातील तळेगाव, मानेपुरी, राठी अंतरवाली, चापडगाव, शिंदे वडगाव, पानेवाडी, गुरूपिंप्री, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, सरफगव्हाण, निपानी पिंपळगाव, मंगू जळगाव, रवना, कृष्णनगर, मुढेगाव, पानेगाव, आवलगाव आदी २२ गावे जोडण्यात आली आहे.
राणीउंचेगाव ३३ केव्हीमधून क्षमतेपेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा होत असल्याने विजेच्या अनेक समस्या वाढल्या. यामुळे भुतेगाव येथे ३३ केव्ही दुसरे उपकेंद्र मागील एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. यामुळे राणीउंचेगाव ३३ केव्हीमधील भुतेगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली आणि कारला परिसराचा काही भाग भुतेगावला जोडण्यात आला भुतेगावला घनसावंगी १३२ केव्हीमधून वीज पुरवठा जोडला आहे. घनसावंगी १३२ केव्हीमधून राणीउंचेगाव लाही वीज पुरवठा जोडला जाणार आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी फक्त ७ पोलचे अंतर आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
भुतेगाव ३३ केव्हीच्या उदघाटन कार्यक्रमात वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी राणीउंचेगावला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून पाच दिवसामध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. परंतु हा वीजपुरवठा अद्यापही जोडला गेला नाही. यामुळे शेतकरी विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)