प्रवेशासाठी अडचणींची शर्यत
By Admin | Published: July 11, 2017 12:28 AM2017-07-11T00:28:00+5:302017-07-11T00:29:23+5:30
औरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे. शिक्षण विभागाचे सर्व्हर हँग झाल्यामुळे सोमवारी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप झाला.
यावर्षी पहिल्यांदाच औरंगाबाद महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली; पण सुरुवातीला काही दिवस सतत सर्व्हर हँग होत राहिल्यामुळे विद्यार्थी व पालकांना आॅनलाइन नोंदणीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. पालकांची ही अडचण लक्षात येत शिक्षण संचालनालयाने आॅनलाइन नोंदणीसाठी २९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली व प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. शहरातील जवळपास ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास २२ ते २३ हजार प्रवेश क्षमता असली तरी प्रत्यक्षात अकरावीच्या प्रवेशासाठी १९ हजार ३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १ जुलैपासून ‘कोटा’ पद्धतीनुसार प्रवेश सुरू झाले. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण, रात्री उशिरापर्यंत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून यादी जाहीर होऊ शकली नाही.
उद्या ११ ते १३ जुलैपर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीनुसार वाटप करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १४ आणि १५ जुलैपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर महाविद्यालय किंवा विद्याशाखांचा पसंतीक्रम बदलावा वाटला तर ते बदलू शकतात. ज्यांना पसंतीक्रम बदलण्याची इच्छा नसेल, त्यांची प्रवेशासाठी पुढील गुणवत्ता यादीत नावे जाहीर होतील, असे शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी सांगितले.