भूखंड परस्पर विक्री करणार्‍या रॅकेटचा सूत्रधार अटकेत; औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:24 PM2018-01-17T12:24:55+5:302018-01-17T12:25:28+5:30

मुंबईत राहणार्‍या निवृत्त आयकर आयुक्तांचे सातारा परिसरातील दोन मोठे भूखंड बनावट जीपीएद्वारे परस्पर ३० लाख रुपयांत विक्री करणार्‍या रॅकेटचा  आर्थिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला. रॅकेटच्या सूत्रधारास अटक करण्यात आली आहे.

Racket suspect arrested in plot selling case; Aurangabad Economic Offenses Wing | भूखंड परस्पर विक्री करणार्‍या रॅकेटचा सूत्रधार अटकेत; औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

भूखंड परस्पर विक्री करणार्‍या रॅकेटचा सूत्रधार अटकेत; औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबईत राहणार्‍या निवृत्त आयकर आयुक्तांचे सातारा परिसरातील दोन मोठे भूखंड बनावट जीपीएद्वारे परस्पर ३० लाख रुपयांत विक्री करणार्‍या रॅकेटचा  आर्थिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला. रॅकेटच्या सूत्रधारास अटक करण्यात आली आहे.

आजम खान अब्दुल रहेमान खान (रा. लोटाकारंजा, औरंगाबाद) असे अटक केलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी आजम खान याने बनावट कागदपत्रांद्वारे अनेक भूखंडांची अशाच पद्धतीने विक्री केली आहे. मूळ मालकाच्या परस्पर विकलेल्या भूखंडाचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा सहभाग आहे, त्यामागावर पोलीस आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, मुंबई येथील ओंकार गणपत गणवीर हे आयकर आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सातारा परिसरातीलसोनियानगरात प्रत्येकी पाच हजार चौरस फुटांचे एनए-४४ नसलेले दोन प्लॉट खरेदी केले होते. मुंबईत असल्याने ते केव्हा तरी मोकळे भूखंड पाहण्यासाठी येत असत. गणवीर यांच्या भूखंडाजवळ डॉ. गिरिजा पदमे (गारखेडा) यांचेदेखील २९ आणि ३२ असे दोन भूखंड आहेत. ते देखील वर्ष-सहा महिन्यांतून फेरफटका मारतात.

याचाच फायदा घेऊन आरोपी आजम खान याने गत वर्षी मुंबईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात निवृत्त आयुक्त गणवीर यांच्या नावावर दुसर्‍याच व्यक्तीला उभे करून गणवीर यांचे आधार कार्डदेखील बनविले होते. त्याद्वारे खोटे मुखत्यारपत्र (जीपीए) तयार करून आरोपी आजम खान याने रजिस्टर्ड जीपीए प्राप्त केल्यानंतर गणवीर यांचे दोन्ही भूखंड नूतन कॉलनीतील शेख अतीक यांना ३० लाखांना विक्री केले होते; परंतु रजिस्ट्री करताना गणवीर यांच्या भूखंडाऐवजी डॉ. गिरिजा पद्मे यांचा २९ व ३२ नंबरचा प्लॉट दाखवून त्यावरच ताबादेखील करून प्लॉटचे बांधकामही सुरू केले होते. म्हणजे यात अतीकलाही आजम खानने अंधारात ठेवल्याचे उघड झाले.

भेट दिल्याने भूखंड चोरी उघड...
डॉ. पद्मे यांनी त्यांच्या भूखंडावर भेट दिली असता बांधकाम पाहून ते आश्चर्यचकित झाले, तेव्हा अतीक शेख याने प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले; परंतु खरेदीखतामध्ये १ व २ नंबरच्या प्लॉटचा उल्लेख होता. मग डॉ. पद्मेंच्या प्लॉटवर बांधकाम सुरू असल्याने पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे जाऊन सविस्तर प्रकार लक्षात आणून दिला. सदरील कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी प्रकरणाचा सखोल तपास केला असता आरोपी आजम खान अब्दुल रहेमान (लोटाकारंजा) याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्याचे लक्षात येताच आजम खान पसार झाला होता. मुंबईच्या बीआयटी चाळीत छापा मारून आजम खान यास (दि.१२ जानेवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी पार पाडली. 

Web Title: Racket suspect arrested in plot selling case; Aurangabad Economic Offenses Wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.