छत्रपती संभाजीनगर बीजेपी महिला मोर्चात राडा; आधी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारी, नंतर हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:09 PM2024-08-01T13:09:36+5:302024-08-01T13:11:36+5:30
महिला मोर्चाचे दोन गट आमने-सामने : प्रकरण गेले होते पोलिसांपर्यंत
छत्रपती संभाजीनगर : भाजपाच्या प्रदेश विस्तारकांच्या बैठकीनंतर शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष आणि सरचिटणीसमध्ये मारहाण होण्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली. मारहाणीचे प्रकरण क्रांतीचौक पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पोलिस ठाण्यात दोन्ही गट एकमेकांविरोधात तक्रार करण्याच्या तयारी असतानाच भाजपाचे सरचिटणीस हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविली गेली नाही. परंतु या प्रकारामुळे भाजपाच्या संस्कृतीला ठेच लागली असून, महिलांमध्ये भर रस्त्यावर मारामारी होण्याचा प्रकार कनिष्ठ पदाधिकाऱ्यांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
भाजपाच्या राज्य विस्तारकांचा वर्ग आयएमए हॉल येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत झाले. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक दृष्टीने नियोजन कसे करायचे, कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण, जिल्हा अधिवेशन, मंडळ अधिवेशनासाठी बैठकीत सूचना देण्यात आल्या. राज्यातील १४० विस्तारक उपस्थित होते.
वर्ग संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर महिला मोर्चाच्या दोन्ही गटाने तक्रारी केल्या. त्यानंतर बावनकुळे यांनी सर्वांच्या बाजू समजून घेत आयएमए हॉल सोडले. ते दुसऱ्या गेटने कारकडे जात असतानाच महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा आणि सरचिटणीसांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यातूनच दोन्ही गट एकमेकांसमक्ष आले. त्यांनी शिवीगाळ सुरू केल्यामुळे सगळी गर्दी जमली. दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात एका महिलेच्या चेहऱ्यावर तर दुसऱ्या गटातील महिलेच्या हाताला जखमा झाल्या. पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण सोडविले. दरम्यान, हा प्रकार बावनकुळे यांच्यावर कानावर गेला. त्यांनी तातडीने सरचिटणीस शेंडगे यांना प्रकरण थांबविण्यासाठी आयएमए हॉलवर पाठविले. परंतु तोपर्यंत दोन्ही गट क्रांतीचौक पोलिसांत गेले होते. दरम्यान, तेथे हर्षवर्धन कराड आणि शेंडगे यांनी धाव घेत दोन्ही गटांची समजूत काढली. शेंडगे यांनी सांगितले, सगळा प्रकार काय आहे, हे समजून घेऊन वरिष्ठांना सांगण्यात येईल, त्यानंतर कारवाईचा निर्णय होईल.
महिला राजीनामा देण्याच्या तयारीत
महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा नियुक्तीपासून दोन गट पडले आहेत. चार महिला सरचिटणीसांसह इतर वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांचे व शहराध्यक्षांचे जमत नाही. त्यामुळे काही महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेला वेळ देणे सोडून दिले आहे. बुधवारचा प्रकार पाहता पक्षातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करावी, अन्यथा पक्षाचा राजीनामा देण्याची भूमिका बोलून दाखविली. आता पक्ष कुणावर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
सगळा प्रकार समजून घेणार
सगळा प्रकार समजून घेण्यात येईल. नेमके काय घडले, त्यानंतर चौकशीअंती कारवाईचा निर्णय होईल. मारहाण कुणामध्ये झाली, का झाली. ही बाब समजून घेतल्यानंतर कारवाई केली जाईल.
-शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजपा