कामावरून काढल्याने कंपनीत राडा; मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:47 PM2023-12-22T12:47:09+5:302023-12-22T12:47:30+5:30
दीड महिन्यापासून कंपनीत कामासाठी येत नसल्याने त्यास कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती
वाळूज महानगर : कंपनीत कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापकास शिवीगाळ करून तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी दुपारी उद्योगनगरीत ‘फाईन पॅकेजिंग’ या कंपनीत घडली. या प्रकरणी आरोपी अरुण संपत अवचरमल (२६) याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील फाईन पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट क्रमांक के.६४ )या कंपनीत अरुण संपत अवचरमल हा पूर्वी ठेकेदार संजय वैष्णव यांच्यामार्फत वाहनचालक म्हणून काम करीत होता. दीड महिन्यापासून कंपनीत कामासाठी येत नसल्याने त्यास कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनीतून काढून टाकल्याने संतप्त झालेल्या अरुणने बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कंपनीत प्रवेश केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक राधेमोहन दुबे (५६) हे प्लॅंट हेड संजय सरोदे यांच्या सोबत कंपनीतील झाडाखाली गप्पा मारत होते. संतप्त झालेल्या अरुण याने व्यस्थापक दुबे यांच्याशी वाद घालत तुमच्यामुळेच मला कंपनीतून काढून टाकल्याचा आरोप करीत मला पीएफ मिळाला नसल्याचे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा वाद सुरू असताना व्यवस्थापक राधेश्याम दुबे यांनी अरुण अवचरमल यास तुला ठेकेदाराने कामावरून काढून टाकले असून, तुझ्या पीएफची जबाबदारी ठेकेदारावर असल्याचे सांगितले. मात्र, संतप्त झालेल्या अरुण अवचरमल याने व्यवस्थापक दुबे यांना शिवीगाळ करत लपवून ठेवलेले तलवार काढत ‘कौन साला मेरा पीएफ देता नही’ असे म्हणत तलवारीचा धाक दाखवित जिवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. वाद सुरू असताना कंपनीतील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिस हेल्पलाइन संपर्क साधला असता आरोपी अरुण अवचरमल याने सुरक्षारक्षकाला धक्का मारून कंपनीतून पसार झाला. याप्रकरणी व्यवस्थापक राधेश्याम दुबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण अवचरमल याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.राम तांदळे हे करीत आहेत.