सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:05 PM2024-11-23T19:05:45+5:302024-11-23T19:07:27+5:30
स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत.
सिल्लोड : विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून अफवा पसरल्याने मतमोजणी केंद्राच्या बाहेरील जमाव अनियंत्रित झाला. मतमोजणी देखील काही काळ बंद करण्यात आली, त्यानंतर सत्तार की बनकर यांच्यात कोण विजयी झाले याबाबत माहिती मिळत नसल्याने अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसानी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. मतदारसंघात कलम १४४ लागू करण्यात आले असून स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत.
निवडणूक निकालाच्या बाबतीत सोशल मीडियावरून अफवा पसरल्याने मतमोजणी केंद्रा भोवती मोठा जमाव जमला. त्यांनी गोंधळ घातला पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज करत जमाव पांगवला. माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी जमावाला शांत केले. तणाव व वाद वाढू नये म्हणून निवडणूक विभागाने मतमोजणी काहीकाळ थांबवली.
मतदारसंघात कलम १४४ लागू
मतदारसंघात २५ व्या फेरीची मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना बाहेर ठराविक उमेदवार विजयी झाल्याची अफवा पसरली. यामुळे जमावाने एकच जल्लोष सुरू झाला. मात्र, काहीनी अद्याप मतमोजणी सुरू असल्याचे सांगितल्याने अफवांचे पेव फुटले. त्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जमाव जमला. परिस्थिती नियंत्रणासाठी सिल्लोडमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.