अब्दुल सत्तारांच्या कार्यालयाबाहेर राडा; दोघांनी विष घेतले तर चौघांनी अंगावर डिझेल ओतले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 07:58 PM2024-10-10T19:58:53+5:302024-10-10T19:59:10+5:30
आदिवासी समाजाच्या मागणीसाठी दोघांनी घेतले विष तर चार लोकांनी अंगावर डिझेल ओतले..
छत्रपती संभाजीनगर: आदिवासी कोळी समाजाला कोळी मल्हार जात वैद्यता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सोबत मिटिंग करून आमचा प्रश्न मार्गी लावा, या मागण्यासाठी धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सेनाभवन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी दोघा जणांनी विष प्राशन केले तर चार जणांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. सिल्लोड शहर पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी आदिवासी कोळी समाजाची बैठक घेऊन त्यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. अब्दुल सत्तार यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे, हा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र अब्दुल सत्तार हे मुंबईला कॅबिनेट बैठकीला गेल्याने आंदोलकासोबत तयांची भेट झाली नाही. यामुळे आंदोलकांनी रोष व्यक्त करत गोंधळ घातला. अचानक दोघांनी विष प्राशन केले तर चौघांनी अंगवर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सिल्लोड शहर पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन तुमचा प्रश्न सोडवू असे, आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीय सहायक यांच्या मार्फत आंदोलन कर्त्यांना फोनद्वारे दिले आहे.
या आंदोलनात राजू दांडगे,दिपक सूरडकर रा उंडणगाव यांनी विष प्राशन केले तर रविंद्र इंगळे, सिताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले यातील विष प्राशन केलेल्या राजू दांडगे,दिपक सूरडकर यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे. तर अंगावर डिझेल घेणाऱ्या सिताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. इतर काही आंदोलकांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले आहे. पोलीस निरीक्षक शेषराव उदार, बुधवंत यांनी परिस्थितीत नियंत्रणात आणली.