सलग दुसऱ्या वर्षीही आठवलेंच्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:29 AM2019-01-15T00:29:18+5:302019-01-15T07:15:49+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सुत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.
औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.
या सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा प्रसंगावधान राखून जमावाला शांत करण्यासाठी पोलीस धावले. लाठीचार्ज न करता जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त तरुणांनी खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करीत घोषणाबाजी केली. तेव्हा हजारोंच्या संख्येने सभेसाठी जमलेला जमाव हा प्रकार पाहून सैरावैरा धावत सुटला.
यावेळी व्यापीठावर आठवले यांच्या भोवती त्यांच्या बॉडीगार्डने कडे केले. व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते खाली उतरले व जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पाहून जवळपास अर्ध्यावर जमाव निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा सभा सुरु झाली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ प्रास्ताविकात म्हणाले, नामांतरचा हा लढा रामदास आठवले यांनी सलग १७ वर्षे लढला आणि तो यशस्वीही केला. या लढ्यात हजारो दलितांच्या घराची राखरांगोळी झाली. शेकडो भिमसैनिकांचे बळी गेले. बाळासाहेबांचा आाम्हाला आदर आहे. परंतु बाळासाहेब आपण या लढ्याला ‘ आऊट डेटेड इशू’ म्हणालात. माझे तुम्हाला पाच प्रश्न आहे. नामांतराच्या या लढ्यात तुम्ही कुठे होतात. खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर भोतमांगेला न्याय देण्याच्या लढ्यात आपण कुठे होता.
संयज ठोकळ यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर सूत्रसंचालनासाठी मिलिंद शेळके यांनी माईक हातात घेतला व ते म्हणाले, तुम्ही त्यांना हेही विचारा बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेबांना अखेरच्या वेळी संभाळताना तुम्ही कुठे होता. पीईएसच्या जागेवर कार्यक्रम घेण्यासाठी २५-२५ हजार रुपये घेतले जातात. बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे उद््गार ऐकताच व्यासपीठासमोर सभेसाठी बसलेला जमाव संतप्त झाला. त्यातील तरुणांच्या टोळक्याने खुर्च्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जमाव सैरावैर पळू लागला.
बाबूराव कदम, नागराज गायकवाड, अॅड. गौतम भालेराव, टीपू सुलतानचे वंशज मन्सूरअली खान, खा. चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाल्यानंतर रामदास आठवले यांच्या भाषणाने आजच्या या सभेचा शेवट झाला. आठवले आपल्या भाषणात म्हणाले, आजचा हा दिवस कोणावरही टिका टिप्पणी करण्याचा नाही. पक्ष वेगवेगळे असतील. पण ‘जय भिम’च्या नावाखाली आपण सर्व एकच आहोत. आपल्या समाजाच्या नेत्यांवर टिका करू नये. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. आजही आपले सर्व नेते व सगळा समाज एकत्र येत असेल तर मी मंत्रीपदाला लाथ मारायला तयार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. ऐक्य होत असेल तर मंत्रीपद साडायाला आजही तयार आहे. मंत्रीपदे अशी येत असतात आणि जात असतात. एक कार्यकर्ता म्हणून मी सैदेव तुमच्या सोबत राहीन.
दगडफेकही झाली
संतप्त जमावाने खुर्च्यांची मोडतोड तर केलीच, पण समोर व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी राजनंदीनी साऊंड सर्व्हिसचे संचालक किशोर बाबर यांच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.