छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतीपदी राधाकिशन पठाडे
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 22, 2023 02:44 PM2023-05-22T14:44:16+5:302023-05-22T14:45:07+5:30
विशेष म्हणजे, दोघांनी प्रत्येकी १४ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२व्या सभापतिपदी भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राधाकिशन पठाडे व उपसभापतिपदी मुरलीधर चौधरी यांची बहुमताने निवड झाली. सोमवारी (दि. २२ मे) दुपारी १:४० वाजता विजयी उमेदवारांची घोषणा करताच फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या दणदणाटाने जाधववाडी कृउबा परिसर दणाणून गेला होता.
राज्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी ही बाजार समिती आहे. या बाजार समितीने यंदा ८९व्या वर्षांत पर्दापण केले आहे. या सर्वात जुन्या व ‘राजकीयदृष्ट्या’ महत्त्वाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाचे ११ उमेदवार, महाविकास आघाडीचे ४ उमेदवार व २ व्यापारी संचालक, १ हमाल-मापाडी मतदार संघातील उमेदवार असे १८ संचालक निवडून आले होते.
त्यानंतर आज सोमवारी सभापती व उपसभापतिपदाची निवड बिनविरोध होणार अशी अपेक्षा होती; पण सभापतिपदासाठी युतीचे राधाकिशन पठाडे विरोधात मविआचे जगन्नाथ काळे व उपसभापतिपदासाठी युतीचे मुरली अण्णा चौधरी यांच्या विरोधात मविआचे महेंद्र खोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागली. व्यापारी संचालक कन्हैय्यालाल जैस्वाल व नीलेश सेठी तसेच हमाल मापाडी संचालक देविदास कीर्तीशाही यांनी युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि राधाकिशन पठाडे सभापतिपदी तर मुरलीधर अण्णा चौधरी हे उपसभापतिपदी १४ विरुद्ध ४ मताने निवडून आले.