कुलसचिवांसमोर विद्यार्थी संघटनांचे ‘रघुपती राघव...’; गांधी जयंतीची सुटी रद्द केल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:44 PM2018-10-03T15:44:29+5:302018-10-03T15:44:59+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त असलेली राष्ट्रीय सुटी रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी घेतला होता.
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त असलेली राष्ट्रीय सुटी रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी घेतला होता. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी (दि.२) विद्यापीठात धाव घेत कुलसचिवांच्या दालनात ‘रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम...’ हे भजन सुरू केले. तसेच प्रशासनाला गुलाबाचे फूल देत त्याच्या पाकळ्या दालनात पांगवून स्वच्छता करण्याची गांधीगिरी केली. शेवटी प्रशासनाने माघार घेत दुपारी १ वाजता सुटी जाहीर केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी गांधी जयंतीची सुटी रद्द करीत प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता एसएमएसद्वारे दिले होते. मात्र, याची माहिती विद्यार्थ्यांनाही नव्हती. अनेक कर्मचाऱ्यांना निरोपही मिळालेला नव्हता. यामुळे विद्यार्थी विभागांकडे फिरकलेच नाही. याचवेळी एनएसयूआय, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, एसएफआय आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीत धाव घेतली. तेव्हा कुलगुरूसुद्धा सुटीवर होते. यामुळे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांचे दालन गाठले. त्यांना सुटी रद्द करण्याचा गांधीगिरी पद्धतीने जाब विचारला.
सुटी रद्द केल्यामुळे अगोदर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले. हात जोडून माफी मागितली, तरीही कुलसचिव सुटी रद्द करण्याचा निर्णय घेत नव्हत्या. यामुळे दालनात ठिय्या देत ‘रघुपती राघव राजा राम, पतीत पावन सीताराम...’ हे भजन सुरू केले. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या दालनात फुलांच्या पाकळ्या पांगवून झाडू आणून स्वच्छता केली. शेवटी कुलसचिवांनी कुलगुरूंशी संपर्क साधून दुपारी एक वाजता रद्द केलेली सुटी पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी काँग्रेस, एनएसयूआयचे राजेश मुंढे, उपाध्यक्ष नीलेश आंबेवाडीकर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, प्रथमेश देशपांडे, उमेश जगदाळे, अक्षय जेवरीकर, योगेश बहादुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल दांडगे, दीपक बहीर, एसएफआयचे लोकेश कांबळे, सत्यजित म्हस्के, स्टॅलिन आडे, प्राजक्ता शेटे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
अभिवादनाचाही विसर
विद्यापीठ प्रशासनाने गांधी जयंतीची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानुसार नियमाप्रमाणे विद्यापीठ सुरूही झाले. मात्र, महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यास प्रशासन विसरले. याचाही विद्यार्थी संघटनांनी तीव्र निषेध करीत कुलसचिवांच्या दालनात गांधीजींचे छायाचित्र आणून अभिवादन केले.
कुलगुरू अनुपस्थित
गांधी जयंतीची सुटी रद्द करण्याचा आदेश देऊन कुलगुरू सुटीवर निघून गेले. याचाही संघटनांनी निषेध केला. दुसऱ्या एखाद्या महान नेत्यांच्या जयंतीची सुटी रद्द केली असती, तर त्या नेत्याच्या समाजाने कुलगुरूंना पळता भुई केली असती. महात्मा गांधी म्हणजे सगळंच चालतं या मानसिकतेतून कुलगुरूंनी हा निर्णय घेतला. मात्र, गांधी विचारांचे लोक अद्यापही अस्तित्वात आहेत. त्यामुळे यापुढे असा प्रयत्न करू नये, असा इशारा युवक काँग्रेसचे राजेश मुंढे यांनी दिला.