कापसाच्या पिकातील गांजाच्या शेतीवर छापा, २७३ किलोची ५४० झाडे जप्त
By सुमित डोळे | Published: October 13, 2023 03:20 PM2023-10-13T15:20:05+5:302023-10-13T15:25:02+5:30
शेतकऱ्यास ताब्यात घेऊन फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या पिकामध्ये गांजाची शेती करणाऱ्या सोयगावातील टिटवीतील सुखलाल जाधव (५८) या शेतकऱ्याच्या शेतात छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने सुमारे २७३ किलोची ५४० झाडे जप्त केली असून त्याला अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांना बुधवारी टिटवी परिसरात कालिंका डोंगराच्या पायथ्याशी कपाशी व तुरीच्या पिकात गांजाची झाडांची लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पथकासह सुखलालच्या शेतात छापा मारला. तेव्हा जवळपास ५४० गांजाची झाडे आढळून आले. त्याला ताब्यात घेत त्याच्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
१० फुटांपर्यंत वाढ, पाने ओरबाडलेली
सुखलालने यापूर्वीदेखील गांजाचे पीक घेऊन विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. पिकांची वाढ चांगली होण्यासाठी ठिंबक सिंचनद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था उभारली होती. जवळपास १० फुटांपर्यंत पीक वाढले होते. काही पाने व बोंडे अर्धवट ओरबाडलेली आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गेल्या सहा महिन्यांत चारपेक्षा अधिक ठिकाणी गांजाची शेती आढळल्याने याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
छायाचित्र आहे.