औरंगाबादमधील सर्वात मोठ्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; ५४१ सिलिंडर पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:05 PM2022-06-03T19:05:16+5:302022-06-03T19:05:52+5:30

घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत कमी आहे. त्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅसमध्ये मोटारीच्या सहाय्याने गॅस भरण्यात येत होता.

Raid on the largest illegal gas refilling station in Aurangabad; 541 cylinders seized | औरंगाबादमधील सर्वात मोठ्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; ५४१ सिलिंडर पकडले

औरंगाबादमधील सर्वात मोठ्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; ५४१ सिलिंडर पकडले

googlenewsNext

औरंगाबाद : शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधपणे चालविण्यात येणाऱ्या गॅस रिफिलिंगच्या सर्वात मोठ्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात व्यावसायिक, घरगुती वापराचे १४ आणि ५ किलोचे तब्बल ५४१ सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याशिवाय गॅस रिफिलिंग करण्यासाठीचे साहित्य, वाहनांसह एकूण २५ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

छावणी ठाण्यातील उपनिरीक्षक गणेश केदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उपायुक्तांच्या पथकातील सहायक उपनिरीक्षक हरिश खटावकर, हवालदार शेख हारुण, आर. जे. गवळे, बी. जी. गिरी यांच्या पथकाने पडेगावातील पॉवर हाऊससमोरील अन्सार कॉलनीत छापा मारला. त्यानंतर छावणी पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर छावणीचे निरीक्षक शरद इंगळे, उपनिरीक्षक पांडुरंग डाके, गणेश केदार यांच्यासह जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे आदी घटनास्थळी पोहचले. या गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर चारजण सापडले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ४० बाय २५ एवढ्या आकाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये हा अड्डा चालविण्यात येत होता. 

पोलिसांनी मुख्य आरोपी सय्यद मुजीब शेठ याच्यासह शाहरुख अन्वर कुरेशी (दोघेही रा. पडेगाव), किशोर गोकुळ खरात (रा. उस्मानपुरा), ईश्वर सुखदेव घायतडक (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) यांच्यासह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४१ सिलिंडर, ५ वजनकाटे, ५ विद्युत मोटारींसह आयशर कंपनीचा ट्रक, दोन छोटा हत्ती लोडिंग रिक्षा, एक ॲपे रिक्षा असा एकूण १५ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक केदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास निरीक्षक शरद इंगळे करत आहेत.

असे मिळाले सिलिंडर
- भरलेले व्यावसायिक वापराचे ७ सिलिंडर
- रिकामे व्यावसायिक वापराचे ५१ सिलिंडर
- घरगुती वापराचे भरलेले १७५ सिलिंडर
- घरगुती वापराचे रिकामे २०६ सिलिंडर
- पाच किलो वापराचे १०२ सिलिंडर

असा केला जायचा वापर
घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत कमी आहे. त्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅसमध्ये मोटारीच्या सहाय्याने गॅस भरण्यात येत होता. त्याशिवाय गॅसवरील चालणाऱ्या रिक्षामध्येही हा गॅस भरण्यात येत होता. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल करण्यात येत होती. हा अड्डा मागील अनेक दिवसांपासून चालू असताना त्याकडे पोलिसांच्या विविध शाखा, ठाण्याचे दुर्लक्ष होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याचेही समजते.

मुजीब शेठ चालवायचा धंदा
गॅस रिफिलिंगचा हा अवैध धंदा पडेगाव येथील सय्यद मुजीब शेठ चालवत होता. त्याचा आणखी एक अड्डा छावणीतील बाजार परिसरात चालविण्यात येतो. त्याच्याकडेही पोलिसांनी डोळेझाक केलेली आहे. पोलिसांसोबतच्या उत्तम संबंधानंतरही एवढी मोठी कारवाई झाल्यामुळे गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

इतर अड्ड्यावर कारवाई केव्हा?
गॅस रिफिलिंग आणि बायोडिझेलचे अनेक अड्डे शहराच्या सीमावर्ती भागात चालतात. यात एमआयडीसी वाळुज, एमआयडीसी सिडको, सातारासह इतर ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अड्डे असल्याचे समजते. या अड्ड्यांवर गुन्हे शाखा, पोलीस उपायुक्तांचे पथक आणि संबंधित ठाण्यांचे विशेष पथक केव्हा कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बेगपुऱ्यात ३५ सिलिंडर पकडले
बेगपुरा ठाण्याच्या पथकानेही जयसिंगपुरा भागात छापा मारुन अवैधपणे गॅस रिफिलिंग करताना ३५ सिलिंडर जप्त केले आहेत. यात शेख सलमान शेख पाशा हा धंदा करीत होता. या कारवाईत एकूण ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या आदेशावरून गुन्हा नोंदवला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

Web Title: Raid on the largest illegal gas refilling station in Aurangabad; 541 cylinders seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.