मराठवाड्याला रेल्वेने चारा पुरवठा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:11 PM2018-12-13T22:11:34+5:302018-12-13T22:12:23+5:30
मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. तसेच चारा दावणीला देणे शक्य नाही. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.
औरंगाबाद : मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. तसेच चारा दावणीला देणे शक्य नाही. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज स्पष्ट केले.
औरंगाबाद आणि लातूर विभागाच्या पशुसंवर्धन खात्याची आढावा बैठक जानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जून २०१९ पर्यंत चारा कमी पडणार नाही. एका गावात पिण्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा होत असेल तर पशुधनासाठीदेखील दोन टँकर पिण्याचे पाणी देण्याबाबत तातडीने तरतूद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाºयांकडे मागणी येताच त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येतील. विभागाला किती चारा कमी पडणार याबाबत अंदाज बांधणी सुरू आहे. पालघर येथे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध आहे. तेथून रेल्वेने मराठवाड्यात चारा पोहोचविणे शक्य आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत बैठक झाली आहे. रेल्वेने याबाबत होकार दिल्याचे त्यांनी सांगितले. ३ किलो सुका व ७ किलो ओला, असे १० किलो चारा प्रतिदिन उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.
पशुसंवर्धन खात्यातील १ हजार १५ रिक्त जागांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लोकसेवा आयोगामार्फत काही जागा भराव्या लागतील. ९६ उपायुक्तांच्या जागा भरती करण्यात आल्या आहेत. चतुर्थश्रेणीतील जागा आयुक्त पातळीवर भरण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र काम केल्यास दुष्काळाची दाहकता कमी होईल, असे ते म्हणाले.
गैरप्रकार होणार नाही
चारा आणि पाणीपुरवठ्यात गैरप्रकार होणार नाही. चारा छावणीत पुरवठा केला जाईल. जिओ टॅगिंगमुळे पारदर्शकता असेल. चारा छावण्यांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीच्या सूचनेनुसार कामाला गती मिळेल. सध्या तरी चारा छावण्या सुुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आलेली नाही, असा दावा जानकर यांनी केला.