रेल्वेची परीक्षा द्यावी की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:02 AM2021-03-17T04:02:02+5:302021-03-17T04:02:02+5:30
विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार : दोन्ही परीक्षा रविवारी एकाच दिवशी ........... विजय सरवदे .................... औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ...
विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार : दोन्ही परीक्षा रविवारी एकाच दिवशी ........... विजय सरवदे ....................
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा, या दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजी रविवारी एकाच दिवशी होत आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने, तर रेल्वेकडून ‘नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी’ (एनटीपीसी) घेण्यात येणारी ही परीक्षा देखील ऑनलाइन; परंतु केंद्रावरच होणार आहे. औरंगाबाद शहरातील ५९ केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार आहेत, तर ३२ हजार २०८ जागांसाठीची रेल्वेची परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून करीत आहेत. मात्र, ‘एमपीएससी’ने १४ मार्च रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि राज्यभरात आंदोलन सुरू झाले. शेवटी शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही परीक्षा या २१ मार्च रोजीच होणार असल्याने परीक्षार्थींची तारांबळ उडाली आहे. या सगळ्या गोंधळात मागील दोन- तीन वर्षांपासून तयारी करणारे होतकरू, शेतकरी कुटुंबातील मुले अत्यंत बिकट परिस्थितीमधून मार्ग काढून अभ्यास करत आहेत. त्यांना एका परीक्षेची संधी गमावण्याची चिंता लागली आहे.
चौकट.....
केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत
औरंगाबादेत शनिवार व रविवार या दोन दिवशी कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे रिक्षा किंवा अन्य वाहतूक सुविधा बंद
असणार आहेत. एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे, शहरातील हॉटेल, दुकाने सर्व बंद असतील. विद्यार्थ्यांना दिवसभर दोन सत्रांत चहा- पाण्याविना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
चौकट...........
रेल्वेची परीक्षाही केंद्रांवरच
दुसरीकडे, दोन वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या ‘एनटीपीसी’ या परीक्षेसाठी अर्ज करून तयारी सुरू केली होती. रेल्वेची ही परीक्षा ३२ हजार २०८ जागांसाठी होत असून, ती मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. ही परीक्षा ऑनलाइन असली, तरी परीक्षा केंद्रावरच जाऊन द्यावी लागते. बँक किंवा अन्य ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकांची सुविधा असलेल्या महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूटमध्ये या परीक्षेची केंद्रे निश्चित केली जातात.
चौक..............
आमचा गोंधळ उडाला आहे
माझी ‘एमपीएससी’च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही औरंगाबादेत हडको येथील परीक्षा केंद्रावर आहे, तर रेल्वेच्या परीक्षेसाठी जळगाव केंद्र आलेले आहे. रेल्वेची ऑनलाइन परीक्षा असली तरी ती केंद्रावर जाऊनच द्यावी लागते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा आमचा गोंधळ उडाला आहे.
-जया पाटील, परीक्षार्थी विद्यार्थिनी
त्या दिवशी, तर लॉकडाऊन
राज्यसेवा पूर्वपरीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. मात्र, त्या दिवशी औरंगाबादेत लॉकडाऊन आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा, शहरवाहतूक बस किंवा इतर साधने उपलब्ध होतील की नाही, हे सांगता येत नाही. प्रामुख्याने परीक्षा देण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे.
-गोविंद पांचाळ, परीक्षार्थी विद्यार्थी
आता तरी परीक्षा रद्द होऊ नये
आम्ही अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून औरंगाबादेत येऊन ‘एमपीएससी’ची तयारी करत आहोत. सातत्याने राज्यसेवेची ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होत आहे. १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करून २१ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. आता तरी ही तारीख रद्द होऊ नये म्हणजे झाले.
-सुनील कांगुळे, परीक्षार्थी विद्यार्थी