ट्रकच्या धडकेनंतर रेल्वे गेटचे खांब अडकले विजेच्या लाइनला; अनेक रेल्वे खोळंबल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:34 IST2025-03-11T16:33:39+5:302025-03-11T16:34:54+5:30
रेल्वेसाठी लासूर रेल्वे गेट बंद होत असताना तेथून पुढे निघण्याच्या घाईने मक्याने भरलेला ट्रक फाटकाला धडकला.

ट्रकच्या धडकेनंतर रेल्वे गेटचे खांब अडकले विजेच्या लाइनला; अनेक रेल्वे खोळंबल्या
छत्रपती संभाजीनगर/लासूर स्टेशन : लासूर स्टेशन येथे ट्रकच्या धडकेने रेल्वे फाटकाचे खांब थेट रेल्वेच्या ओव्हरहेड लाइनमध्ये अडकल्याची घटना सोमवारी (दि. १०) दुपारी २.५० वाजता घडली. यामुळे मनमाड ते नांदेड मार्गावरील जवळपास ७ रेल्वेंचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी, प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.
रेल्वेसाठी लासूर रेल्वे गेट बंद होत असताना तेथून पुढे निघण्याच्या घाईने मक्याने भरलेला ट्रक फाटकाला धडकला. रेल्वे फाटकाचे खांब थेट रेल्वेच्या ओव्हरहेड केबलला (२५ हजार केव्ही) अडकले. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जवळपास ३ तास छत्रपती संभाजीनगर - मनमाड रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लासूर स्टेशन येथील रेल्वे फाटक ७ तास बंद होते. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने ये-जा करावी लागली तर चारचाकी वाहनांना कांदा मार्केटजवळील अंडरपास पुलाने प्रवास करावा लागला.
रेल्वे आरसीएफचे परमवीरसिंग व निंबाळकरसह पोलिसांनी ट्रकवर (क्र. एमएच ०५ एएम ९०९०) कारवाई केली आहे. रेल्वे गेटच्या शॉर्टसर्किटमुळे चारही लोकेशन बॉक्समधील वायरिंग फ्युज जळाले. रेल्वे गेट ऑपरेट करणाऱ्या बॉक्समध्येदेखील वायरिंग जळून बिघाड झाला. रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.
सुदैवाने दुर्घटना टळली
यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ओव्हरहेड केबलला रेल्वे गेटचा पाइप ट्रकसह अडकला. ट्रकमध्ये मका पोते असल्याने त्या पोत्यावर तो पाइप असल्याने मोठी जीवितहानीदेखील टाळली. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला, अशी माहिती रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली.
रेस्क्यू टीम घटनास्थळी
घटनेनंतर तासाभरात रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे गेटचा पाइप बाजूला करून तात्पुरती तारेची बायडिंग करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
या रेल्वेंवर परिणाम
या दुर्घटनेमुळे तपोवन एक्स्प्रेस अडीच तास, मराठवाडा एक्स्प्रेस एक तास, जनशताब्दी ४५ मिनिट, वंदे भारत एक्स्प्रेस ४० मिनिट उशिराने धावली. नांदेड - पुणे, काचिगुडा - नागरसोल, शिर्डी - काकीनाडा या रेल्वेही उशिराने धावल्या.