मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न येणार ‘फास्ट ट्रॅक’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:22+5:302021-07-08T04:04:22+5:30
औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आणि वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्नांसाठी झगडणाऱ्या अवघ्या मराठवाड्यातील जनतेला ...
औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आणि वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्नांसाठी झगडणाऱ्या अवघ्या मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न आता ‘फास्ट ट्रॅक’वर येतील आणि मराठवाड्यात रेल्वेचा विकास होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यातही बहुतांश एकेरी मार्गच. परिणामी, रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षानुवर्षे निघून गेली. आगामी ३० ते ४० वर्षांच्या दृष्टीने तयार केलेल्या नव्या राष्ट्रीय रेल्वे योजनेतही मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत आणि रेल्वे प्रश्नांसाठी होणारी संघटनांची आंदोलनेही बंद झाली आहेत. त्यामुळे मराठवाड्यात रेल्वेचा विकास कसा होईल, असा सवाल जनतेतून उपस्थित करण्यात येतो.
मराठवाड्यात रेल्वे प्रश्न, मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एकतर केराची टोपली दाखविली जाते. अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. परिणामी, मागण्यांच्या जंजाळातच रेल्वे अडकली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च आहे. परंतु आता मराठवाड्यातील रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास मराठवाड्याला मिळालेल्या रेल्वे राज्यमंत्री पदामुळे व्यक्त होत आहे.
चौकट
दुहेरीकरणाला मिळेल ‘ग्रीन सिग्नल’
मुदखेड ते परभणी या ८१ कि. मी. मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले. यामुळे परभणी-औरंगाबाद-मनमाड २९१ कि.मी. मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेनेही या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे एकेरी मार्गावरूनच रेल्वे धावत आहे. परंतु रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे विद्युतीकरणापाठोपाठ आता दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
----
प्रलंबित रेल्वे प्रश्न, मागण्या पूर्ण होण्याची आशा
१) रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग.
२)औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव मार्ग.
३) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई व्हाया पैठण-औरंगाबाद-जळगाव मार्ग.
४) जालना-खामगाव रेल्वे मार्ग.
५)औरंगाबाद- नगर-पुणे मार्ग.
६)औरंगाबादेत पीटलाईन.