रेल्वेत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:28 PM2019-03-18T23:28:12+5:302019-03-18T23:29:15+5:30
औरंगाबाद : रेल्वेत महिलेचा विनयभंग करणारा प्रभूलाल शंकरलाल यादव याला सोमवारी (दि.१८) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.ए. हुसेन यांनी सहा ...
औरंगाबाद : रेल्वेत महिलेचा विनयभंग करणारा प्रभूलाल शंकरलाल यादव याला सोमवारी (दि.१८) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.ए. हुसेन यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती २३ एप्रिल २०१४ रोजी तिच्या एका नातेवाईकासोबत लग्नासाठी परतूर येथे गेली होती. लग्न लागल्यानंतर दोघे त्याचदिवशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास काचिगुडा-मनमाड पॅसेंजरने औरंगाबादकडे निघाले होते. गाडीत गर्दी असल्यामुळे संबंधित महिला रेल्वेच्या दरवाजाजवळ उभी होती. दरम्यान, जालना येथे दोन ते तीन व्यक्ती रेल्वेतून खाली उतरत असताना आरोपी प्रभूलाल शंकरलाल यादव (५३, रा. वजिराबाद, नांदेड) याने महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करीत असतानाच फिर्यादी व तिच्या नातेवाईकाने सहप्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले. त्याला गाडीत बसवून औरंगाबादला आणले व पोलिसांच्या हवाली केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३५४ (अ) अन्वये सहा महिने सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सोपान धुमाळ यांनी सहकार्य केले.