रेल्वे सुरक्षा बल ‘निद्रावस्थेत’; पोटूळ स्टेशनवरच्या त्याच सिग्नलवर चारदा लुटली रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:10 PM2022-04-23T19:10:26+5:302022-04-23T19:11:11+5:30
रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त फक्त स्टेशनपुरतीच... हे वास्तव दरोडेखोरांच्या पथ्यावर पडत आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : स्टेशनपासून एक कि.मी. अंतरावर सिग्नल... सिग्नल जवळ दरोडेखोरांना क्षणात गायब होण्यासाठी फायदेशीर ठरू शकणारे ६ रस्ते... आजूबाजूला ओसाड माळरान... आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त फक्त स्टेशनपुरतीच... हे वास्तव दरोडेखोरांच्या पथ्यावर पडत आहे. सहजपणे सिग्नलची केबल तोडायची, इमर्जन्सी सिग्नलवर कपडा टाकायचा आणि रेल्वे थांबवून दरोडा टाकायचा, हे धाडससत्र सहा महिन्यांपासून पोटूळ रेल्वेस्थानकाजवळ सुरू आहे. तरीही रेल्वे प्रशासन सुस्त आहे. गेल्या ६ महिन्यांत तब्बल चार वेळा हा प्रकार झाला असून या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस काय करीत आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ रेल्वेस्टेशनजवळ दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. यापूर्वी याच जागेवर अशाप्रकारे तीन रेल्वे थांबविण्यात आल्या. एका घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे लुटमारीची घटना टळली. दरोडेखोर नेमके याच जागेची का, निवड करतात, याविषयी ‘लोकमत’ने घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या.
स्टेशनपासून एक कि.मी. अंतरावर सिग्नल
पोटूळ रेल्वे स्टेशनपासून जवळपास एक कि.मी. अंतरावर सिग्नल आहे. सिग्नल पर्यंत पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता आहे.
दोन वर्षांनंतर निवृत्त होणारा ‘आरपीएफ’ कर्मचारी
कालच्या घटनेवेळी गुरुवारी रात्री पोटूळ रेल्वेस्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) ज्येष्ठ कर्मचारी तैनात होते. दोन वर्षांनंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत. या घटनेच्या वेळी त्यांनी सर्वांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी आरपीएफ जवान तैनात करणे अपेक्षित असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले.
सिग्नल परिसरात एक नव्हे ६ रस्ते
सिग्नलच्या परिसरात रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी ६ रस्ते आहेत. येथेच रेल्वे पूलही आहे. त्याखालून अगदी सहजपणे रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जाऊन पोबारा करणे शक्य होते.
अवघे रेल्वेचे १० क्वाॅर्टर्स
पोटूळ रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेचे १० क्वाटर्स आणि ५ ते ६ घरे आहेत. त्यामुळे प्रवाशांना फारशी मदत मिळू शकत नाही, ही बाबही दरोडेखोरांनी हेरली असावी.
किती स्टेशन, किती सिग्नल ?
बदनापूर ते अंकाईदरम्यान ‘आरपीएफ’च्या अंतर्गंत महत्त्वाची १३ रेल्वेस्टेशन आहे. एका स्टेशनवर दोन्ही बाजूंनी एक-एक असे दोन सिग्नल ग्राह्य धरले तर किमान २६ सिग्नल आहेत. या सिग्नलची सुरक्षा रामभरोसे आहे. कारण रात्रीची गस्त केवळ नावापुरतीच आहे.
मनुष्यबळच नाही, १४० कि.मी, सुरक्षा कशी देणार ?
रेल्वे सुरक्षा बलाच्या अंतर्गत बदनापूर ते आंकाईदरम्यानचा १४० कि.मी. चा परिसर आहे. रेल्वे सुरक्षा बलात एक पोलीस निरीक्षक,२ उपनिरीक्षक, ३ सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि ३३ हवालदार, काॅन्स्टेबल आहे. ही संख्या २००१ च्या क्षमतेप्रमाणे आहे. आता यापेक्षा दुप्पट पदांची आवश्यकता आहे. लोहमार्ग पोलिसांच्या अंतर्गत सेलू ते रोटेगावचा भाग असून त्यांच्याकडेही अवघ्या ४० जणांचे मनुष्यबळ आहे.
दरोडेखोरांमध्ये ‘एक्स्पर्ट’
रेल्वेच्या ‘टीएलजी’ बाॅक्समधील केबल कट केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत इमर्जन्सी सिग्नल लागते. त्या इमर्जन्सी सिग्नलवर कपडा बांधला की, रेल्वे थांबते, ही बाब दरोडेखोरांना माहिती आहे. रेल्वेच्या तांत्रिक बाबींची माहिती असणारा ‘एक्स्पर्ट’ त्यांच्यात सहभागी असावा. तो एक्स्पर्ट कोण असेल, याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.
‘त्या’ अर्धा तासात काय घडले ?
सिग्नलवर दरोडेखोरांनी कपडा बांधला. त्यामुळे रेल्वे चालकाने सिग्नलपासून काही अंतरावर गुरुवारी मध्यरात्री १२.०५ वाजता देवगिरी एक्स्प्रेस थांबविली. तेव्हा पोटूळ रेल्वेस्टेशनवरील स्टेशन मास्तरांनी अवघ्या २ मिनिटांनी इमर्जन्सी सिग्नल देऊन रेल्वे चालकाला पुढे जाण्यास सांगितले; परंतु कपडा बांधलेला असल्याने पुढे जाता येणार नाही, असे रेल्वे चालकाने सांगितले. त्यानंतर काही प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वे चालकाने सिग्नलवरील कपडा काढला. या सगळ्यात अर्धातास गेला. यादरम्यान दरोडेखोरांनी आपले काम फत्ते केले.
‘देवगिरीत’नव्हते आरपीएफ जवान
देवगिरी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी एकही आरपीएफ जवान नव्हता. प्रत्येक रेल्वेत जवान देता येत नाही, असे म्हणून रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले.
यापूर्वीच्या ३ घटना कधी ?
३० ऑक्टोबर २०२१ रोजी याच ठिकाणी देवगिरी एक्स्प्रेसचे अशाप्रकारे थांबविण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिल रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड-मनमाड पॅसेंजर रोखून दरोडा टाकण्यात आला होता.
मोक्षदा पाटील यांनी केली घटनास्थळाची पाहणी
लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे असिस्टंट कमांडंट सी. पी. मिर्धा, पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे, पोलीस हवलदार दिलीप लोणारे, राहुल गायकवाड, अमोल शिरसाट, एस. ए. मुंढे आदी उपस्थित होते. घटनास्थळावरून श्वान पथक काही अंतर पर्यंत गेले. परिसरातील सर्व मार्गांवरील सीसीटीव्हींची तपासणी केली जात आहे.
यापूर्वीच्या घटनेत दोन जण ताब्यात
१ एप्रिल रोजी झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात २ संशयितांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जामखेड येथील हे दोन्ही संशयित आहेत, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
मनुष्यबळ वाढीसाठी प्रयत्न
प्रवाशांनी प्रवासात मौल्यवान ऐवज बागळणे टाळले पाहिजे. अशा घटना यापुढे होणार नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या जातील. मनुष्यबळ वाढीसाठी प्रयत्न केला जाईल. रेल्वे सुरक्षा बलासोबत चर्चा केली जाईल.
- मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग