युरोप, जपानपेक्षाही रेल्वे स्टेशन होईल ‘भारी’; नवे रुपडे पाहून आपसूकच म्हणाल ‘वॉव’
By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2023 08:39 PM2023-07-29T20:39:37+5:302023-07-29T20:40:02+5:30
युरोप, जपानपेक्षा अधिक चांगल्या रेल्वेस्टेशनची निर्मिती करण्याचे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ठेवले आहे.
छत्रपती संभाजीनगर : माॅडेल रेल्वेस्टेशन म्हणून ओळख असलेले छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन आणखी मॉडर्न व रोल मॉडेल ठरेल, रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने एजन्सीकडून रेल्वेस्टेशनवर सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, बदलणारे रूपडे पाहून आपसूकच ‘वॉव’ असे निघेल.
युरोप, जपानपेक्षा अधिक चांगल्या रेल्वेस्टेशनची निर्मिती करण्याचे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने देशभरातील २०० स्टेशनवर ‘रूफ प्लाझा’ बनणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. यात रूफ प्लाझा म्हणजे एकप्रकारे रेल्वे रुळांवर छत तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबरच अनेक अत्याधुनिक सुविधाही नव्या स्टेशनवर असणार आहेत.
वेरूळ लेण्यांच्या संकल्पनेनुसार काम
पर्यटनगरीत देश-विदेशातून पर्यटक येतात. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या संकल्पनेनुसार रेल्वेस्टेशनचे काम केले जाणार आहे.
लवकरच कामाला सुरुवात
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, रेल्वेस्टेशनच्या पुनर्विकासाच्या कामाचे वर्क अवाॅर्ड झाले आहे. एजन्सीकडून कामाचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी रेल्वेस्टेशनवर सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
नवे रेल्वेस्टेशन कसे राहणार?
- रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने स्टेशनमध्ये प्रवेश करण्याची सुविधा.
- संपूर्ण आच्छादित फलाट.
- फूड कोर्ट, प्रतीक्षालय, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा.
- किरकोळ दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांसह एक रूफ प्लाझा.
- स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा.