पावसामुळे रेल्वे मुंबईपर्यंत गेल्याच नाहीत, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 06:21 PM2021-07-22T18:21:00+5:302021-07-22T18:26:46+5:30

रेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत.

Railways did not reach Mumbai due to rain, hundreds of students' careers turned to 'waste' | पावसामुळे रेल्वे मुंबईपर्यंत गेल्याच नाहीत, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’

पावसामुळे रेल्वे मुंबईपर्यंत गेल्याच नाहीत, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील पावसाने अनेक वर्षांचा अभ्यास वायारविवारी झाल्या ३ महत्वाच्या परीक्षा झाल्या  

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक रेल्वे मुंबईला न जाता अर्ध्या प्रवासातूनच परतल्या. पण त्या दिवशी मुंबईत ‘यूपीएससी’सह ३ परीक्षा होत्या.

रेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या करिअरवरच पावसाचे पाणी फेरले गेले. मुंबईत १८ जुलै रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरूची महात्मा गांधी नॅशनल फेलोशिप, फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाची मॅनेजर पदांसाठी आणि ‘यूपीएससी’ची इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा पार पडली. त्या दिवशी पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नगरसोल, नाशिक, मनमाड, लासलगाव, इगतपुरी येथे रोखण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामध्ये या तिन्ही परीक्षा देण्यासाठी जाणारे परीक्षार्थीही होते. अनेक रेल्वे मुंबईला पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे आयआयएम बंगळुरूची एमजीएनएफ, यूपीएससीची ‘ईएसई’ आणि ‘एफसीआय’चे परीक्षार्थी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे उमेदवारांना परीक्षेविना राहावे लागले.

शासनाने न्याय द्यावा
देवगिरी एक्स्प्रेस लासलगाव येथूनच माघारी परतली. या रेल्वेत माझ्यासह ३५ परीक्षार्थी होते. मुंबईतील विशेषत: केंद्राच्या परिसरात राहणाऱ्यांनाच परीक्षा देता आली. वर्षानुवर्षे अभ्यास केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. शासनाने भवितव्याशी न खेळता एक संधी देऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.
- विशाल बंसवाल, परीक्षार्थी

पुन्हा संधी मिळावी
नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा देण्यापासून वंचित राहिलो. यात आम्हां विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही. जर परीक्षेचे केंद्र पूर्ण राज्यभर असते, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार केंद्राची निवड केली असती आणि आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास झाला नसता. संबंधित विभागाने अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी.
- तुकाराम राजारूपे, एफसीआय परीक्षार्थी

Web Title: Railways did not reach Mumbai due to rain, hundreds of students' careers turned to 'waste'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.