वादळी वारे अन् गारांचा पाऊस...
By Admin | Published: May 11, 2016 12:22 AM2016-05-11T00:22:02+5:302016-05-11T00:24:04+5:30
लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
मोघा, नागराळ, बेंडकाळ, सालेगावला झोडपले : महाविद्यालयासह अनेकांच्या घरांचे नुकसान
लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे लोहाऱ्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. एकही पत्रा जागेवर राहिलेला नाही. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले. तर सालेगाव परिसराला गारांच्या पावसाने झोडपले. जवळपास वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
लोहारा शहरासह परिसरातील सालेगाव, नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांत मंगळवारी दुपारी साडेचार सुमारास अचानक वादळी वारे सुरु झाले. हे वारे प्रचंड वेगाने वाहत होते. वादळी वाऱ्यासह जवळपास वीस ते पंचेविस मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण कांबळे, रसुल फकीर, सुखदेव रोडगे आदींच्या घरांवरील पत्रे उडाली. तसेच तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महेबूब शेख यांच्या हॉटेलसमोरील पत्र्याचा निवाराही उडून गेला. तसेच याच परिसरातील काहीजणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील गंजीही उडून गेल्या. त्यामुळे कडब्याचे मोठे नुकसान झाल्याचे सुरेश झिंगाडे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वर्गखोल्या पत्र्याच्या शेडच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. या शेडचा एकही पत्रा जागेवर राहिला नाही. जवळपास सात ते आठ वर्गखोल्यांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. जाग्यावर राहीले ते बसण्याचे बाकडे.
दरम्यान, वादळी वारे व पाऊस थांबल्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उडून गेलेले पत्रे जमा केले. तहसील कार्यालयामध्ये सौरदिवे बसविण्यात आलेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील सौरदिव्यांचे खांबही उन्मळून पउले आहेत. त्याचप्रमाणे येथीलच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोरील बाजूला असलेली पानटपरीही वाऱ्यामुळे आडवी झाली.
सालेगाव परिसरात मात्र वादळी वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटेच गारा बसरत होत्या. यामुळे सहदेव मातोळे, दगडू पांडुरंग बलसुरे यांच्या कडब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिवारातील काही ठिकाणची झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच कमलाकर यादव, श्रीमंत मातोळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पंधरा मिनिटे बरसल्या गारा : तहसील परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले