वाळूज महानगरला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:13 PM2019-07-06T23:13:33+5:302019-07-06T23:14:00+5:30
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली.
वाळूज महानगर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास पाऊणतास झालेल्या पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे रस्त्यावर व मोकळ्या भूखंडावर पाणी साचले होते. वडगाव जि.प. शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली.
आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, पाऊस काही येत नाही. जून महिना उलटून गेला तरी अद्याप महानगरात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होऊन १० ते १५ मिनिट रिमझिम पाऊस झाला. दुपारनंतर पुन्हा वातावरणात अचानक बदल होवून आभाळात ढग दाटून आले. दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.
महानगरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, तीसगाव, वडगाव, साजापूर, करोडी, रांजणगाव, जोगेश्वरी या भागात जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरी वसाहतीतील रस्ते जलमय झाले होते.
अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना पाण्यातूनच ये-जा करावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वार, प्रवाशी व व्यवसायिकांची धावपळ उडाली. बजाजनगर येथील मोहटादेवी भाजीमंडईत पाणी साचून चिखल झाल्याने व्यवसायिकांना रस्त्यावर बसावे लागले.