पावसाचा दोन वर्षांतील निचांक
By Admin | Published: August 27, 2014 12:24 AM2014-08-27T00:24:41+5:302014-08-27T00:35:12+5:30
नांदेड: जिल्ह्यात आॅगस्टअखेर दोन वर्षातील निचांकी पावसाची नोंद झाल्याचे स्पष्ट होते़
नांदेड: भौगोलिक रचनेनुसार जिल्ह्यात पावसाळ्यात किमान ९५५़५५ मिमी़ पाऊस पडणे अपेक्षित आहे़ मात्र सद्यस्थितीत पावसाची आकडेवारी पाहता आॅगस्टअखेर दोन वर्षातील निचांकी पावसाची नोंद झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ आत्तापर्यंत केवळ १८२़५९ मिमी़ पावसाची नोंद झाली आहे़
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या ना त्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे़ भर उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीने पावसाळी अनुभव घेतला़ त्यामुळे शेतातील गहू, हरभरा जमिनदोस्त झाला़ असे असले तरी यंदा पाऊस समाधानकारक राहील व पिके जोमाने येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती़ मात्र हे सर्व अंदाज फोल ठरवत काही अपवाद वगळता पावसाची दडी कायम आहे़
जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यात केवळ १८२़५९ मिमी़ पाऊस पर्जन्यमापकावर नोंद झाला आहे़ मागील वर्षी आॅगस्टअखेर ८४५़५४ मिमी़ पाऊस झाला होता़ तर २०१२ मध्ये या महिन्याअखेर ४४०़१७ मिमी़ पाऊस झाला होता़ पावसाच्या या आकडेवारीकडे पाहता गत दोन वर्षातील निचांकी पाऊस यंदा झाल्याचे दिसून येते़ सोमवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली़ यात सर्वाधीक पाऊस माहूर तालुक्यात ५९़७५ मिमी़ तर सर्वात कमी पाऊस देगलूर, बिलोली तालुक्यात ४ मिमी़ झाला़ त्यापाठोपाठ नांदेड-३९़८७, मुदखेड-१५़३३, अर्धापूर-७़३३, भोकर-३२़७५, उमरी-१८़६७, कंधार-१६, लोहा-१७, किनवट-३१़१५, हदगाव-३३़८५, हिमायतनगर-१६़३३, देगलूर-१३़५०, नायगाव-२९़६०, मुखेड-३४़७१ मिमी़ पावसाची नोंद झाली़ अत्यल्प पावसाने हातची पिके गेल्यात जमा आहेत़ उर्वरित एक महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यास तळाला गेलेले जलसाठे भरले तर पेयजलाचा प्रश्न कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात ंआहे़ (प्रतिनिधी)