पाऊस सरासरीपासून दूर

By Admin | Published: September 19, 2016 12:06 AM2016-09-19T00:06:57+5:302016-09-19T00:12:58+5:30

औरंगाबाद : शहर आणि परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. शनिवारी रात्री शहरात तब्बल २१ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवारी दुपारीही काही भागांत रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला.

Rain is far from average | पाऊस सरासरीपासून दूर

पाऊस सरासरीपासून दूर

googlenewsNext

औरंगाबाद : शहर आणि परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. शनिवारी रात्री शहरात तब्बल २१ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवारी दुपारीही काही भागांत रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला.
जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. परंतु चार दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारपासून रोज पाऊस पडत आहे. चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी ७० मि. मी. पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री शहरात २१ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. रविवारी दुपारी गारखेडा, सातारा परिसर, देवळाईसह शहरातील इतरही काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु हा पाऊस चिकलठाणा परिसरात नव्हता. त्यामुळे चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची कोणतीही नोंद होऊ शकली नाही. चार दिवसांत जोरदार पाऊस झाला असला तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अजूनही खूपच कमी पाऊस झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ७३ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. आजपर्यंतच्या सरासरीचा विचार केला तरी प्रत्यक्ष पडलेला पाऊस हा ८८ टक्केच आहे. त्यामुळे आणखी पाऊस पडण्याची गरज आहे.
कुठे ओला तर कुठे कोरडा दुष्काळ
शेंद्रा : गणेश विसर्जनाला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लघु प्रकल्पात पाणी आले असले तरी सुखना धरणात २३ टक्केच जलसाठा झाला आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने तब्बल २६ दिवस उघडीप दिली होती. नंतर पोळ्याच्या दिवशी रात्री परिसरात जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांचा खळखळाट थांबला होता. तो पुन्हा सुरू झाल्याने काही लघु प्रकल्पांत जलसाठा पूर्वपदावर आला होता. विद्युत पंपाच्या साह्याने पाणी देणे सुरूहोते. परंतु बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त होते. पीक हातातून जाणार अशी भीती बळीराजाला सतावत होती.पण सलग दोन- तीन दिवस पाऊस झाल्याने वरझडी, वरुडकाजी, वडखा, कुंभेफळ, हिवरा परिसरात असलेले पाझर तलाव भरून वाहू लागले. नदी, नाल्यांचा खळखळाट सुरू झाल्याने रबी पीक हाती येण्याची चिन्हे आहेत. पाच-सहा वर्षांनंतर बळीराजाला गव्हाचे पीक घेता येणार, अशी परिस्थिती आहे. फळबागा असलेल्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसत आहे.
————
अतिपावसाने खरिपाचे उत्पन्न घटणार
यावर्षी या परिसरात पाऊस कुठे अतिप्रमाणात, तर काही ठिकाणी कमी पडला. जळगाव फेरण येथे कपाशी, मका इ. पिकांची वाढ खुंटली आहे.
काही ठिकाणी कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद या पिकांना गरज असताना पाणी मिळाले नाही. त्यामुळे नंतर पाऊस जास्त झाला असला तरी खरिपाचे उत्पन्न घटणार आहे.


चिकलठाणा येथून वाहणारी सुखना नदी यंदा दुथडी भरून वाहत नाही. तुलनेने या क्षेत्रात पाऊस कमी झाला. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा वाढला नाही. परदारी येथील धरण पूर्ण भरून वाहत असल्यामुळे चित्ते नदी वाहत आहे. अजूनही चांगला पाऊस झाला तर धरणात वाढ होऊ शकते, असे लहुकी शाखेचे अधिकारी महादेव कल्याणी यांनी सांगितले.

हर्सूल तलाव तुडुंब!
हर्सूल तलाव मागील काही दिवसांपासून बराच गाजत आहे. कधी गाळ काढण्याच्या मुद्यावरून तर कधी विसर्जन विहीर तयार करण्यावरून तलाव चर्चेत असतो. मागील चार दिवसांपासून शहर आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला आहे. तलावातील पाणी ओव्हरफ्लो होण्यासाठी अजून २ फूट पाण्याची गरज आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते तलाव परिसरात जांभूळवन येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी यंदा हर्सूल तलाव शंभर टक्के भरणार असे भाकीत केले होते. परतीच्या पावसाने मागील चार दिवसांमध्ये तलावाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. सध्या तलावात १४ फूट पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच आणखी काही दिवस कायम राहिल्यास हर्सूल तलाव ओसंडून वाहणार हे निश्चित. तलावात सध्या समाधानकारक पाणी आल्याने आॅक्टोबरपासून जुन्या शहराला पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजनही मनपा करणार आहे. मागील उन्हाळ्यात मनपाने हर्सूल तलावातील सुमारे ६० हजार क्युबिक मीटर गाळही काढला आहे. त्यामुळे तलावात बऱ्यापैकी पाणी साचले आहे.
६ हजार क्युसेक्सने पाणी
जायकवाडी धरणात ६५.९५ टक्के जलसाठा असून, सध्या ५ हजार ८९२ क्युसेक्सने धरणात पाणी येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने पालिकेला कळविली आहे. सध्या धरणात सुमारे ६६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. परतीचा पाऊस आणखी झाल्यास धरणाची पाणीपातळी वाढेल असा अंदाज आहे.

Web Title: Rain is far from average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.