मराठवाड्यात श्रावण सरी; पहाटेपासून सर्वत्र संततधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 01:36 PM2018-08-16T13:36:16+5:302018-08-16T13:46:49+5:30
मराठवाड्यात सर्वत्र काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले असून श्रावण महिन्यातला हा पहिलाच मोठा पाऊस आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर व उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांत पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे.
जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसानंतर मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. जुलै महिन्यात परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र पावसाने ओढ दिली.मात्र काल रात्री पासून मराठवाड्यात बहुतेक सर्व जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. यानंतर पावसाने जोर पकडत सकाळपासून जोरदार हजेरी लावली. यामुळे मान्सून पूर्व पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
जालना येथे १५ दिवसानंतर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात रात्री पासुन पाऊस सुरु आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध भागात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्यात वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.रात्रीतून जिल्ह्यात सरासरी ५९ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २५.८८ मि.मी., पालम तालुक्यात ९.६७, पूर्णा ३२.८०, गंगाखेड २५.५०, सोनपेठ २५.००, सेलू २१.८०, पाथरी २४.००, जिंतूर ३०.१७ आणि मानवत तालुक्यात २७.३३ मि.मी. पाऊस झाला. पाऊसाची सतंतधार चालुच आहे.
बीड जिल्ह्यात केज शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री दहा वाजल्या पासून सततधार पाऊस. तसेच गेवराई, माजलगाव, धारूर तालुक्यातही संततधार पाऊस आहे. लातूर जिल्हातही पावसाचे आगमन झाले आहे. देवणी येथे राञी पासून भीज पाऊस सूरू असून अाभाळ भरून अाले अाहे. या पावसाने खरीप पीकाना व तसेच जनावरांच्या चाऱ्याला मोठा आधार मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू होता. आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून सकल भागात पाणी साचले आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेने पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी
उस्मानाबाद जिल्ह्यातही दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.