पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा पाऊस; पण...
By साहेबराव हिवराळे | Published: November 3, 2023 06:37 PM2023-11-03T18:37:21+5:302023-11-03T18:38:26+5:30
दुर्गम भागात, कृषी उत्पादकांना पर्वणीच; पण पूर्तता अत्यल्प
छत्रपती संभाजीनगर : महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषिपंपांसाठी ऑनलाइन अर्ज मागवताच ३ लाख ७३ हजार २६६ अर्जांचा पाऊस पडला. त्यांतील ३ लाख १८ हजार ४२४ लाभार्थी परिपूर्ण ठरले; परंतु त्यातील पूर्तता केवळ १४ हजार ७४२ जणांचीच झाली. छत्रपती संभाजीनगरासह जालना, परभणी, हिंगोलीत काही पंप कार्यान्वित झाले आहे. इतर अर्जदार शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण किरकोळ असल्याने प्रकल्प तळालाच आहेत; परंतु एरव्ही पाणी असूनही विजेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या नाकी दम आणतो. अशा अवस्थेत शासनाने शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजना आणली आहे. त्याचा फायदा एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान, तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर सौरपंप देण्यात येत आहे. त्यामुळे वीज गुल झाल्याने घुसमट होणार नाही आणि केव्हाही ओसाड जमिनीवर कृषी उत्पादन घ्या आणि शेतात सोने पिकवा, असेच पीएम कुसुम पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उद्दिष्ट वाढवून देण्याची गरज
ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी, पाहणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष सौरपंप बसविणे अशा विविध चक्रव्यूहांतून जावे लागते. पूर्तता अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी भगवान गायकवाड, सुभाष पाटील-पांडभरे यांनी केली आहे.
एकच सौरपंप घेता येतो...
अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरू नयेत. अधिकचे अर्ज रद्द होईल. एकाच सौर कृषिपंपासाठी अर्ज करावा.
- विनोद सिरसाट, जीएम, सौर महाऊर्जा