औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राची हजेरी; वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज कोसळून तिघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:37 PM2022-06-11T19:37:59+5:302022-06-11T19:38:38+5:30
जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली.
औरंगाबाद: शहरात आणि जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचे विजांच्या गडगडाटासह जोरदार आगमन झाले. दरम्यान, पैठण येथे दोन तर सिल्लोड येथे एक असा तिघांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
सायंकाळी पैठण शहरात जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली. मृगाचा पाऊस शेतजमीनीसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैठण विहामांडवा, नवगाव, टाकळी, पिंपळवाडी, आवडे उंचेगाव, पाचो परिसर, आडूळ रजापूर असा सर्वदूर पावसाने शनिवारी दुपारनंतर हजेरी लावली. केकत जळगाव येथे शेतात काम करत असताना जवळच वीज कोसळल्याने शेतकरी गजानन दराडे (२७) यांचे ह्दय बंद पडून मृत्यू झाला तर आडगाव जावळे येथील सांडू शामराव नजन यांच्या घरा लगत वीज कोसळल्याने सांडू नजन यांची बहीन सरूबाई शहादेव लांडे यांचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन्ही घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार दत्ता निलावाड यांनी तलाठ्यास दिले आहेत.
सिल्लोड तालुक्यात एकाचा मृत्यू
सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी पाऊस झाला काही ठिकाणी चांगला जोरदार तर काही ठिकाणी रिपरिप हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, वादळी वारा जास्त होता. यामुळे अनेक घरे व वखारींचे टिन पत्रे उडाली. तर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक उटाडेवाडीतील एका शेतात वीज पडून शेतकरी जागीच ठार झाला. पालोद येथे एक म्हैस वीज पडून मरण पावली. सावखेडा येथे वीज पडून मरण पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव संजय नथु उटाडे वय ४५ वर्षे रा. उटाडेवाडी सावखेडा असे आहे.ते शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक दुपारी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.