ये रे.. ये रे.. पावसा ! मराठवाड्यात ढग नसल्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:46 PM2019-08-13T17:46:07+5:302019-08-13T17:49:34+5:30
मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी चार दिवसांतच प्रयोगाला ढगांअभावी विश्रांती घ्यावी लागली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रयोग झाला नाही; परंतु विमानाचे उड्डाण यशस्वी झाले होते. दुसऱ्या दिवशी प्रयोगासाठी हव्या असलेल्या ढगांची गर्दी नसल्याने विमानाने उड्डाण भरले नाही. रविवारी पैठण, जालना, औरंगाबाद तालुक्यांतील काही भागांवर दोन विमान फिरले. एरोसोल्सने फवारणी केली. परंतु पाऊस होण्यावर त्याचा परिणाम झाला नाही. मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे. विभागात आजवर १२७.३१ मि.मी. पावसाची तूट आहे.
सोमवारी प्रयोग करण्यासाठी विमान उड्डाण घेईल, त्याचे काही परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु वैमानिकांनी सोमवारी विश्रांती घेतली. त्यामुळे सकाळी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची बैठक झाली नाही. परिणामी उड्डाण होऊ शकले नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होऊन प्रयोगाबाबत निर्णय होणार आहे. सोमवारी विश्रांती घेतल्यामुळे आता मंगळवारी प्रयोग होणार असल्याचे विभागीय महसूल उपायुक्त सतीश खडसे यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत प्रयोगाच्या अनुषंगाने दररोज सकाळी ११ वाजता आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांच्या बैठकी होतील. रविवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुपारी दीड वाजता चिकलठाणा विमानतळावरून विमान उडाले. तीन तालुक्यांवर विमानाने मेघबीजरोपण (एरोसोल्स) केले. मात्र त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती समोर आली नाही.
दमदार पावसाची अपेक्षा
मराठवाड्यातील बहुतांश धरणे अजून मृतसाठ्यातच आहेत. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहे.जायकवाडी वगळता मराठवाड्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी केल्यामुळे ९ आॅगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. अजून तरी त्या प्रयोगातून काही हाती लागलेले नाही.
७७९ मि.मि. विभागाची पावसाची सरासरी
४२०. मि. मी. आजवर पाऊस होणे अपेक्षित होते.
१२७.३१ मि.मी. पावसाची सध्या तूट आहे.
२९२.८४ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे.
६६ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नाही.
३७.५ इतकाच पाऊस आजवर झालेला आहे