औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:11 AM2018-06-23T00:11:28+5:302018-06-23T00:12:13+5:30

शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते.

Rainfall in Aurangabad; Power gul; Machinery sluggish | औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

googlenewsNext
ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी वृष्टी : नागरिकांना छळण्यात महापालिका आणि महावितरणमध्ये लागली स्पर्धा; शहराचे कसे होणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते. हर्सूल पॉवर हाऊस येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा ७ तास खंडित होता, तर बन्सीलालनगर परिसराचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला.
शहरात काल रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महावितरणचे पितळ उघडे पाडले. पावसाळ्यात नागरिकांना अखंडित वीज मिळावी म्हणून महावितरणने केलेली मान्सूनपूर्व कामे पावसाअगोदर दिलासा देणारी असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती वल्गनाच ठरली. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास अवघे शहर अंधारात बुडाले होते. शहराच्या जुन्या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरणचे शहरात क्रमांक- १ व क्रमांक- २ असे दोन विभाग कार्यरत आहेत. विभाग क्रमांक- १ अंतर्गत छावणी, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भावसिंगपुरा, भीमनगर, पेठेनगर, पडेगाव, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी, गोलवाडी, सातारा परिसर, देवळाई, रोजाबाग, औरंगपुरा, हर्सूल, जटवाडा रोड, तसेच शहर क्रमांक- २ अंतर्गत भारतनगर, गारखेडा, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, सिडकोतील विविध सेक्टर संपूर्णपणे अंधारात बुडाले. हर्सूल येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे महावितरणच्या छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा रात्री ११ वाजता खंडित झाला. या उपकेंद्राला हर्सूल पॉवर हाऊस येथून वीजपुरवठा होतो. अभियंते-कर्मचाºयांनी भर पावसात अथक प्रयत्न केले; पण पहाटेपर्यंत केबल दुरुस्त होऊ शकली नाही. अखेर सकाळी दुसºया केबलमार्फत छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू केला, तेव्हा सकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. याच उपकेंद्रांतर्गत बन्सीलालनगरचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यामुळे रात्री त्या परिसरातील तीन फिडर बंद पडले. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा औद्योगिक परिसर व लगतचा परिसर तीन तासांहून अधिक काळ अंधारात होता. रेणुकानगर येथील फिडर बंद पडल्यामुळे भारतनगर, हनुमाननगर, तसेच गारखेडालगतच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग म्हणाले की, पावसामुळे शहरातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भात महावितरणने सुरू केलेल्या कंट्रोल रूमकडे जवळपास ७० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार महावितरणच्या अधिकारी, अभियंते व कर्मचाºयांनी भरपावसात शर्थीचे प्रयत्न करून ठिकठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत केला. छावणी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील केबल दुरुस्तीला थोडा विलंब लागला.

दोन बळी घेतल्यानंतर महापालिकेला जाग
औरंगाबाद : शहरातील सर्व धोकादायक मॅनहोल बंद करा, पुलांना सुरक्षा कठडे नसतील तर युद्धपातळीवर ते उभारण्याचे काम सुरू करावे, असे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले. जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. धोकादायक बाब कुठेच दिसता कामा नये, असे आदेश आता सर्व वॉर्ड कार्यालयांना बजावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात दोन दिवसांत दोन बळी गेल्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल शहरभर संतापाची लाट पसरली आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर येथे मॅनहोलमध्ये पडून भगवान मोरे या गरीब कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तासही झालेले नसताना गुरुवारी मध्यरात्री सिडको एन-६ भागातील बजरंग चौकात चेतन चोपडे या ३५ वर्षीय तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे शहरात महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जयभवानीनगर येथे धोकादायक नाल्यावर वेळीच ढापे टाकले गेले असते, तर मोरे यांचा मृत्यू झालाच नसता, अशी भावना नागरिक बोलून दाखवीत आहेत.
मागील वर्षीही तरुणाचा मृत्यू
बजरंग चौक येथे नाल्याच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून नारेगाव येथील १८ वर्षीय गरीब तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महापालिकेने बोध घेतला नाही. शहरात किमान ३५० ठिकाणी मॅनहोल उघडे असतील. पुलांना कठडे नसलेली ४० पेक्षा अधिक ठिकाणे असावीत, असा अंदाज मनपानेच वर्तविला आहे.

Web Title: Rainfall in Aurangabad; Power gul; Machinery sluggish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.