भोकरदन, जाफराबाद, मंठ्यात अवकाळी पाऊस
By Admin | Published: May 1, 2017 12:29 AM2017-05-01T00:29:40+5:302017-05-01T00:34:24+5:30
जालना: भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना वादळीवाऱ्यासह रविवारी अवकाळी पावसाने दणका दिला.
जालना: भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना वादळीवाऱ्यासह रविवारी अवकाळी पावसाने दणका दिला. अवकाळीमुळे कांदा, फळ पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. वादळामुळे अनेक घरावरील पत्रे तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
जिल्ह्यात यंदा तापमानाने उच्चांक गाठून ४२ अंशांचा आकडा पार केला. उकाड्यामुळे नागरिक असह्य होत आहेत. त्यातच रविवारी दुपारपासून अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस पडेल असा अंदाज होता. मात्र भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना अवकाळीने जोरदार तडाखा दिला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, आन्वा आदी गावांत सुमारे तासभर वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. विजेचा कडकडाटही होता. जाफराबाद शहर व परिसरातही पाऊस पडला. मंठा तालुक्यातील उस्वद परिसरात अवकाळीने हजेरी लावली.वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे तसेच झाडे उन्मळून पडली. अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
विवाह समारंभाची दाणादाण
भोकरदन तालुक्यात ३० एप्रील रोजी सांयकाळी ७ वाजेच्या दरम्यान अचानक बेमोसमी पावसाला सुरूवात झाल्यामुळे सायंकाळी असलेल्या विवाह समारंभाची मोठी दाणादाण झाली.
तालुक्यात पावसाचे वातावरण नसताना ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे तालुक्यातील सायंकाळच्या विवाहसमारंभामध्ये मोठी तारांबळ उडाली होती. तर काही ठिकाणी वातावरण बघून तात्काळ विवाह समारंभ उरकण्यात आले. मात्र स्वयंपाकाची मोठी नासाडी झाली तर सभामंडप पडल्यामुळे वऱ्हाडी मंडळीनी विवाह समारंभातून काढता पाय घेऊन जागा मिळेल त्या ठिकाणी आधार घेतला. तालुक्यातील भोकरदन, हसनाबाद, कुंभारी, केदारखेडा, राजूर, भायडी, दानापूर, आलापूर, आन्वा, जळगाव सपकाळ, पारध, पिंपळगाव रेणुकाई, वाकडी, वाडी, फत्तेपूर, सिपोरा बाजार, निंबोळा, वडशेद, करजगाव, कल्याणी, सुरंगळी, देहेड, आव्हाना, गोकुळ, मनापूर, मलकापूर, बरंजळा साबळे या भागात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पाऊस व वाऱ्यामुळे चालकांना रस्त्यावरून वाहने चालविणे सुध्दा कठीण झाले होते त्यामुळे काही वेळ वाहने सुध्दा थांबवावी लागली होती़
एकूणच अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यात मोठे नुकसान झाले नसले तरी विवाह समारंभात वऱ्हाडी मंडळीचे मोठे हाल झाले. (प्रतिनिधी)