पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:41+5:302021-07-07T04:04:41+5:30

पैठण : पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी उगवून वर आलेले पिकांचे अंकुर जळत आहेत. ...

Rainfall, crisis of double sowing | पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट

पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext

पैठण : पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी उगवून वर आलेले पिकांचे अंकुर जळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याने बळीराजा मोठ्या अपेक्षेने पावसाची प्रतीक्षा करत आहे. दोन दिवसात पावसाचे आगमन झाले नाहीतर जवळपास ५७ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावरील पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हवामान खात्याने चांगल्या पावसाचे वर्तविलेले भाकीत व एक जूनलाच झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या पावसाने पाठ फिरविल्याने धोक्यात आल्या आहेत. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ८४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी सुकलेले पिकांचे अंकुर पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली असून सध्या चातकासारखी बळीराजा पावसाची प्रतीक्षा करत आहे.

यंदा चांगल्या पावसाचे शुभ वर्तमान हवामान खात्याने सुरुवातीला दिल्याने बळीराजा सुखावला होता. प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने आतापर्यंत ८४ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाठ यांनी सांगितले. खरिपाखाली ८१ हजार १६५ हेक्टर क्षेत्र येते. यापैकी ६७ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

दरम्यान पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने अनपेक्षितपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. गेल्या १५ दिवसात २८ जूनला सरासरी २६ मि.मी पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली. या परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याप्रमाणे तापमानात वाढ होऊन जोरदार वारे सुटल्याने जमिनीतील ओलावा सुकत असल्याने उगवून वर आलेले पिकांचे अंकुर माना टाकत आहेत.

--------------------

पावसाने मारली दडी.....

आजच्या तारखेपर्यंत यंदा सरासरी ११४.७० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेला सरासरी २६५.९० मि.मी पाऊस पडला होता. यंदा मात्र जवळपास सरासरी १११ मि.मी पाऊस अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे.

--------

मंडळनिहाय पाऊस ५ जुलैपर्यंत मि.मी.

पैठण - १२७

( २०२० - २८९)

----------------------------------

पिंपळवाडी - १२७

( २०२० - २३८)

----------------------------------

बिडकीन - १२६

(२०२० - ३१७)

-----------------------------------

ढोरकीन - ११६

(२०२० - २३०)

-------------------------------------

बालानगर - ८५

(२०२० - २३८)

--------------------------------------

नांदर - १०३

(२०२०- २५९)

----------------------------------------

आडूळ - १५३

(२०२०- ४००)

-----------------------------------------

पाचोड - ९७

(२०२० - २५३)

------------------------------------------

लोहगाव - १३३

(२०२० - २५९)

-----------------------------------------

विहामांडवा - ११२

(२०२० - १७४)

-------------------- - -------------------

कापूस, ऊस, तुरीचे क्षेत्र वाढले

पैठण तालुक्यात लागवडीखालील क्षेत्रापैकी ६७ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून ६० टक्के म्हणजे ४१ हजार ३२० हेक्टरवर कापसाची लागवड झाल्याने यंदाही नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी कापसालाच प्राधान्य दिले. या पाठोपाठ उसाखाली ११ हजार २१० हेक्टर व तुरीची ८ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. बाजरी १,८२० हेक्टर, मका १,७४५ हेक्टर, उडीद १२९ हेक्टर, मूग ५६० हेक्टर, इतर कडधान्य ४४ हेक्टर, भुईमूग २१ हेक्टर, भाजीपाला ४०५ हेक्टर, सोयाबीन १,५६३ हेक्टर, तेलबिया ४ हेक्टर, कांदा ५७८ हेक्टर, व इतर तृणधान्याखाली ६६ हेक्टर क्षेत्र पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्र लक्षात घेता तुरीखालील क्षेत्रात झालेली वाढ दिसून येते. तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढल्याने तालुक्यात सोयाबीनची लागवड यापुढे वाढणार असे दिसून येत आहे.

---------

दोन दिवसात पाऊस आला नाही तर सारा उन्हाळा

शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर मशागत करून पेरणी केली. पिके उगवून वर आली मात्र पावसाने दडी मारल्याने ती धोक्यात आली आहे. त्यातच उन्हाचा तडाखा वाढला असून रातच्या वेळेला वारा सुटल्याने जमिनीतील ओल टिकत नाही. यामुळे पिकाचा भरवसा राहिला नाही. दोन दिवसात पाऊस आला नाही तर सारा उन्हाळा होईल.

-- दादा म्हस्के, शेतकरी, आखतवाडा

Web Title: Rainfall, crisis of double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.