शहरासह जिल्हाभरात गारांचा अवकाळी पाऊस
By Admin | Published: April 29, 2017 11:32 PM2017-04-29T23:32:21+5:302017-04-29T23:33:43+5:30
लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़
लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़ या पावसामुळे ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेल्याची घटना घडली आहे़ जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, उदगीर, औसा, निलंगा, शिरूरअनंतपाळ, देवणी, अहमदपूर, जळकोट आदी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़
रेणापूर तालुक्यात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरासह पावसाला सुरूवात झाली़ हा पाऊस तालुक्यातील खरोळा, पानगाव, तळणी, मोहगाव, कारेपूर, अंदलगाव, निवाडा, पळशी, भोकरंबा आदी गावात पाऊस झाला़ यावेळी अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ तर शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या़ येरोळसह शिरूरअनंतपाळ तालुक्यात ढगाळ वातावरण आणि थंड गारवा होता़ चाकूर तालुक्यातील जानवळ, वडवळ, रायवाडी, चापोली, शेळगाव, कलकोटी, उजळंब, कबनसांगवी, नळेगाव, घरणी, आष्टामोड आदी गावच्या परिसरातही हा पाऊस झाला़ या पावसामुळे चाकूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर भिजली़ तर उदगीर तालुक्यातील एकूर्गा रोड, वाढवणा (बु), हाळी हंडरगुळी, गुडसूर, डोंगरशेळकी आदी परिसरातही पाऊस झाला़
हाळी हंडरगुळी परिसरात वादळी वारा आणि पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ वीजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ यावेळी जवळपास एक तास वीज गायब होती़ तर औसा तालुक्यातील आलमला, किल्लारी, उत्का, भादा, लामजना, भेटा, उजनी, आदी गावच्या परिसरात शनिवारी दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ किल्लारी येथे वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाला़