अर्ध्या वाळूज महानगराला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:03 AM2019-06-11T00:03:48+5:302019-06-11T00:04:15+5:30

वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाºयाने औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला.

Rainfall of half a sage metropolitan | अर्ध्या वाळूज महानगराला पावसाचा तडाखा

अर्ध्या वाळूज महानगराला पावसाचा तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह पाऊस : कामगार- व्यावसायिकांची तारांबळ, वीजपुरवठा खंडित


वाळूज महानगर : वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाºयाने औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी कडक ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी साडेचार वाजता वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पंढरपूर, वळदगाव, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, तीसगाव, वडगाव, रांजणगाव आदी भागांत जवळपास अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस झाला. तर वाळूज, जोगेश्वरी, पाटोदा, लांझी आदी भागांत हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरी वसाहतीतील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक, प्रवासी व दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. कामाहून सुटलेल्या कामगारांना भिजतच घरी जावे लागले. मोहटादेवी भाजीमंडईत पाणी साचून चिखल झाल्याने व्यावसायिकांना रस्त्यावर बसावे लागले. पंढरपुरातील तिरंगा चौकात झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली. मात्र तेव्हा रस्त्यावर कोणीही नसल्याने हानी टळली. फांदीमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अखेर वाहनधारकांनी रस्त्यावरील फांदी उचलून बाजूला करून रस्ता मोकळा केला.
रांजणगावात भिंत पडली....
रांजणगाव येथील किशोर सांडू सुरडकर यांच्या घराच्या तिसºया मजल्याचे बांधकाम सुरू आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून शेजारील शंकर संपत गायकवाड यांच्या घरावर पडली. मलब्यामुळे गायकवाड यांच्या घराचे छत व पत्रे कोसळून खाली पडले. यात घरातील पलंग, कूलर, टीव्ही, पंखा, शेगडी व इतर संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तलाठी राहुल वंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले.
औद्योगिक क्षेत्रासह निवासी भागातील वीजपुरवठा खंडित
वाळूज महानगराला वीजपुरवठा करणाºया पडेगाव येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनमध्ये ब्रेक डाऊन झाल्यामुळे उद्योगनगरीसह अनेक नागरी वसाहतीतील वीजपुरवठा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे उद्योगनगरीतील कारखान्याचे कामकाज ठप्प पडले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तासाभराच्या अंतराने टप्प्याटप्प्याने उद्योगनगरीतील विविध सेक्टरमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू केल्याचे कार्यकारी अभियंता राजेश भगत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. उद्योगनगरीतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, अनिल पाटील, अर्जुन गायकवाड आदींनी नाराजी व्यक्त करून वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला.

Web Title: Rainfall of half a sage metropolitan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.