शेतकरी ओल्या दुष्काळाने चिंतेत अन् इकडे मुख्यमंत्री उत्सवात मग्न; अंबादास दानवेंचे टीकास्त्र
By बापू सोळुंके | Published: October 22, 2022 06:57 PM2022-10-22T18:57:33+5:302022-10-22T18:58:09+5:30
पावसाने पिकाचे वाटोळे, ओला दुष्काळ जाहीर करा;
औरंगाबाद : या वर्षी सलग अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हाती आलेले मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, राज्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
दानवे म्हणाले की, मी काल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात जाऊन आलो. मराठवाडा, विदर्भाचाही नुकताच दौरा केला. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले. पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रब्बीची पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे वक्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे कृषिमंत्री गुडघाभर पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करतानाचे व्हिडीओ आहेत. ते सोडले, तर राज्यातील अन्य मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उत्सव साजरा करण्यात मग्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.