पावसाचे पाणी नागरी वसाहतीत शिरण्याची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:41 PM2019-06-03T22:41:16+5:302019-06-03T22:41:28+5:30
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्याप बजाजनगरमध्ये पावसाळापूर्व नालेसफाई सुरु करण्यात आलेली नाही.
वाळूज महानगर : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्याप बजाजनगरमध्ये पावसाळापूर्व नालेसफाई सुरु करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी नाले तुंबल्याने पावसाचे पाणी नागरी वसाहतीत शिरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात असले तरी ऐन पावसाळ्यात नालेसफाई होऊ शकेल का आणि त्याने काय साध्य होईल, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
बजाजनगरात एमआयडीसी प्रशासनाकडून रस्ते, पाणी, स्वच्छता आदी नागरी सुविधा पुरविण्यात येतात. बजाजनगरातून वेगवेगळ्या ठिकाणांवरुन वाहणाºया नाल्याची एमआयडीसी प्रशासन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करते. पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावरील पाणीही या नाल्यातून वाहते. अनेकदा नाल्यात केर-कचरा अडकत नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी नागरी वसाहतीत शिरण्याची भिती असते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून बजाजनगरात पावसाळा सुरु होण्याची काही दिवस अगोदरच साफ-सफाई करीत असते.
सद्यस्थितीत बजाजनगरात सांडपाणी वाहुन जाणारे नाला तुडुंब भरला असून, गटारीही ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. निवासी क्षेत्रातून वाहणाºया गटारीत अनेक ठिकाणी केर-कचरा व माती साचली आहे. काही ठिकाणी गटार नाल्यावर ढापे नसल्याने सांडपाणी उघड्यावरुनच वाहते. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी प्रशासनाकडून अयोध्यानगरातून वाहणाºया मुख्य नाल्याचे ठेकेदाराकडून बांधकाम करुन हा नाला पक्का करण्यात आला. याचे काम करताना ठेकेदाराने नाल्याचा मुख्य प्रवाह अरुंद ठेवला असून, कामही अर्धवट सोडले आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास या नाल्यातून वाहणारे सांडपाणी लगतच्या नागरी वसाहतीत शिरण्याची भितीही नागरिकांतून वर्तविली जात आहे.
नाल्याची साफ-सफाई न करण्यात आल्यामुळे पावसाचे व सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाले-सफाई करण्याऐवजी एमआयडीसी प्रशासन केवळ विविध कारणे दाखवून टोलवा-टोलवी करीत असल्याची ओरड मंदा गाडेकर, दुर्गा निंबोळकर, अर्जुन आदमाने, बसगोंडा पाटील, सुरेश गाडेकर आदींनी केली आहे.