समान शिक्षणासाठी चळवळ उभारा

By Admin | Published: August 24, 2016 12:26 AM2016-08-24T00:26:42+5:302016-08-24T00:48:04+5:30

औरंगाबाद : अलीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा आणि गरिबांच्या मुलांसाठी वेगळ्या. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विषमता वाढत आहे.

Raise the movement for equal education | समान शिक्षणासाठी चळवळ उभारा

समान शिक्षणासाठी चळवळ उभारा

googlenewsNext


औरंगाबाद : अलीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा आणि गरिबांच्या मुलांसाठी वेगळ्या. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विषमता वाढत आहे. सर्वांना के.जी. ते पी.जी.पर्यंतचे शिक्षण मोफत, समान व गुणवत्तापूर्ण मिळालेच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ उभारावी लागेल, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आज येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने आयोजित मराठवाडा शिक्षण हक्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेचे उद्घाटन समाजवादी नेते तथा अ.भा. समाजवादी अध्यापक सभेचे संस्थापक अध्यक्ष भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. शरद जावडेकर, डॉ. एच.एम. देसरडा, माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे, विशाखा खैरे, विजय शिंदे, अ‍ॅड. बी.एच. गायकवाड तसेच दत्ताभाऊ पाथ्रीकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. दिनकर बोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शिक्षण हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे अजमल खान यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी भाई वैद्य म्हणाले की, आतापर्यंतच्या आजी-माजी सरकारांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. महासत्तेकडे वाटचाल करताना केवळ शस्त्र खरेदीसाठी सर्वाधिक तरतूद करून चालणार नाही. एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या (जीडीपी) सर्वाधिक तरतूद ही शिक्षण आणि आरोग्यांवर जो देश करतो. तो देश महासत्ता म्हणून उदयास येतो. याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. आपल्या देशात शिक्षण ही खरेदी-विक्रीची वस्तू झाली आहे. शेती, शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे आहेत. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शिक्षणातून बहुजन, अल्पसंख्याक, गरीब, वंचितांना हाकलले जात आहे, या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या देशात श्रीमंतांसाठी वातानुकूलित शाळा,तर गरिबांसाठी कोंडवाड्यासारख्या शाळा आहेत. जिथे गुणवत्ता तर नाहीच; पण त्यालाही अवाच्या सवा शुल्क भरावे लागत आहे. देशात ३३ टक्के दारिद्र्यरेषेखालील नागरिक आहेत. तुटपुंज्या मजुरीत ते दिवसभर राबतात. अशा अवस्थेत आपल्या मुलांना ते उच्च शिक्षण कसे देऊ शकतील. त्यासाठी सर्व शिक्षणात समानता हवी. यासाठी लोकचळवळ उभारावी लागेल. या चळवळीत आपण सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Raise the movement for equal education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.