लग्नसराई, रमजानमध्ये सुपर स्प्रेडर ठरले ‘राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:02 AM2021-05-22T04:02:52+5:302021-05-22T04:02:52+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ एप्रिलपासून करण्यात आलेल्या ‘ब्रेक दी चेन- लॉकडाऊ’नमध्ये शहरातील बडे ...

'Raj' becomes super spreader in Lagnasarai, Ramadan | लग्नसराई, रमजानमध्ये सुपर स्प्रेडर ठरले ‘राज’

लग्नसराई, रमजानमध्ये सुपर स्प्रेडर ठरले ‘राज’

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ एप्रिलपासून करण्यात आलेल्या ‘ब्रेक दी चेन- लॉकडाऊ’नमध्ये शहरातील बडे व्यवहारकर्ते आदेशांची पायमल्ली करून प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. लग्नसराई आणि रमजान सणात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरलेल्या ‘राज’ क्लॉथ स्टोअर्सवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी छापा मारून स्टोअर्स सील करण्याचा आदेश दिला.

किराडपुरा, शाहगंज परिसरात सकाळी दळवे तेल भांडारसह २५ ते ३० ठिकाणी कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा ताफा जालना रोडवरील राज क्लॉथ स्टोअर्सवर धडकला. सगळी प्रशासकीय यंत्रणा तेथे येताच स्टोअर्सच्या आतील ग्राहक व कर्मचारी सैरावैरा पळत सुटले, तर सुमारे ७० ते ८० कर्मचारी पाचव्या मजल्यावर पळून गेले. आतमध्ये ग्राहकांसाठी सेल्समनने काउंटरवर टाकलेले कपडे तसेच होते. पोलिसांनी ग्राहकांचा पत्त्यासह पंचनामा केला, तसेच महसूल आणि पोलिसांनी पाचव्या मजल्यावर कोंडून घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे तीन तास ही कारवाई सुरू होती.

आधी मनपा, मग महसूल, नंतर पोलीस

महापालिकेचे वॉर्ड अधिकारी संपत जरारे व पथकाने तळमजल्यावर एका हॉटेलमध्ये पाहणी करून सगळे काही आलबेल असल्याचे समजून काढता पाय घेतला. त्यानंतर महसूलचे पथक तेथे पोहाचले. स्टोअर्समधील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु काही क्षणांत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा ताफा तेथे येताच सगळा प्रकार समोर आला. मनपाच्या पथकाची तेथे चांगलीच भंबेरी उडाली.

आमदार पुत्राची मध्यस्थीसाठी धाव

शहरातील शिवसेनेच्या एका आमदार पुत्राने मध्यस्थी करीत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमदार पुत्राच्या दबावामुळे पालिकेच्या पथकाचे अवसान गळाले. आमदार पुत्राच्या सांगण्यावरून मनपाचे पथक मागे फिरले. दरम्यानच्या काळात पोलीस आणि महसूलच्या पथकाने तळमजल्यावरील मागच्या दाराने स्टोअर्समध्ये प्रवेश करीत आतमध्ये लॉकडाऊनचा आणि ब्रेक दी चेनचा सुरू असलेला फज्जा पाहिला.

महापालिकेचे वॉर्ड कार्यालय शेजारीच

महापालिकेचे प्रभाग क्रमांक ९ हे कार्यालय क्लॉथ स्टोअर्सच्या शेजारीच आहे. १५ एप्रिलपासून आजवर त्या इमारतीत काय चालले आहे, हे पाहण्यासाठी या कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी इमारतीच्या आवाराकडे फिरकलेसुद्धा नाहीत. याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी प्रश्न उपस्थितीत केले. एरवी रस्त्यावरील सामान्य नागरिक आणि किरकोळ दुकानदारांना नागरिकमित्र पथक धमक्या देऊन दंड आकारत आहेत, तर दुसरीकडे बड्या व्यवहारकर्त्यांना सूट देत असल्याचे यातून दिसते आहे.

ऑनलाइनचा व्यवहार ताब्यात

स्टोअर्सच्या आत अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार ज्योती पवार, जिन्सी पोलीस ठाण्याचे केंद्रे आणि मनपाचे वॉर्ड अधिकारी संपत जरारे यांनी संयुक्तरीत्या पाहणी करीत पंचनामे केले. ऑनलाइन व्यवहाराने काउंटरवर जमा झालेल्या मर्चंट कॉपीज ताब्यात घेतल्या, तसेच पूर्ण व्यवहाराचे दस्तावेज घेऊन पंचनामा करून मालमत्ता सील करणार असल्याचे केंद्रे यांनी सांगितले.

महामारीत सुपर स्प्रेडर म्हणून काम केले

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, जालना रोडवरील राज क्लॉथ स्टोअर्स हे मोठे दुकान आहे. या स्टोअर्सने महामारीत सुपर स्प्रेडर म्हणून काम केले आहे. येथे दररोज मागच्या दाराने १०० ते २०० ग्राहक आणून व्यवसाय केला. यातून किती जणांना कोरोनाची लागण झाली असेल, हे सांगणे अवघड आहे. लॉकडाऊनमध्ये येथे अनेक ग्राहकांनी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बिलबुकआधारे एप्रिल आणि मेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. सगळ्याचा पंचनामा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी क्रॉसचेक केल्यानंतर कारवाई केली. सगळे व्यवहार तपासण्यात येणार आहेत.

असा प्रकार केल्यास कोरोनाचा आलेख उंचावेल

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात येईल. तपास लवकरात लवकर पूर्ण करू. कामगार विभागामार्फत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे दुकाने सील करण्यात येत आहे. लोकांना गोळा करून अशा प्रकारे गर्दी केली, तर कोरोनाचा आलेख उंचावेल, त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागेल. सकाळी ११ वाजेपर्यंत परवानगी आहे, त्याचे पालन प्रत्येकाला करावेच लागेल.

Web Title: 'Raj' becomes super spreader in Lagnasarai, Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.