राज ठाकरेंनी ‘व्हिजन’ दाखविलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:42 AM2018-08-31T00:42:31+5:302018-08-31T00:42:59+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील जाणकारांशी संवाद साधला; परंतु प्रत्यक्षात राज ठाकरेंनी औरंगाबादसाठी कोणतेही व्हिजन दाखविले नाही. औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी केवळ नाशिककडे बोट दाखविले. नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांचाच त्यांनी ढोल वाजविला. मात्र, औरंगाबादेतील परिस्थितीसंदर्भात ते आस्थेवाईकपणे आणि अत्यंत तळमळीने बोलताना दिसले.

Raj Thackeray did not show 'Vision' | राज ठाकरेंनी ‘व्हिजन’ दाखविलेच नाही

राज ठाकरेंनी ‘व्हिजन’ दाखविलेच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादला समोर ठेवून नाशिककडे बोट : शहरातील विविध क्षेत्रांतील जाणकारांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील जाणकारांशी संवाद साधला; परंतु प्रत्यक्षात राज ठाकरेंनी औरंगाबादसाठी कोणतेही व्हिजन दाखविले नाही. औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी केवळ नाशिककडे बोट दाखविले. नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांचाच त्यांनी ढोल वाजविला. मात्र, औरंगाबादेतील परिस्थितीसंदर्भात ते आस्थेवाईकपणे आणि अत्यंत तळमळीने बोलताना दिसले.
शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ वाजता ‘औरंगाबाद व्हिजन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वकील, डॉक्टर व उद्योजक, अशा विविध क्षेत्रांतील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने शहराच्या ब्ल्यू प्रिंटसंदर्भात चर्चा होणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले होते. त्यामुळे सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. कार्यक्रमास अतुल कराड, ‘आयएमए’चे डॉ. यशवंत गाडे, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे रावसाहेब खेडकर, लघुउद्योजक प्रमोद झाल्टे, सारंग टाकळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात नाशिक महापालिकेत पाच वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांची चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर शहरातील पाणी, कचरा, रस्ते यासह शहरातील समस्यांवर जाणकरांनी मनोगतातून प्रकाश टाकला.
राज ठाकरे यांनी मार्गदर्शनाची सुरुवातच नाशिकपासून केली. एखादे शहर असे घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक असल्याचे ते म्हणाले. पूर आला तरी खड्डे सापडले नाहीत. नाशिकमध्ये पुढची ५० वर्षे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला. अडीच वर्षे मनपात आयुक्त नव्हते, तरीही मनपा चालविली, असे ते म्हणाले. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधींना जनतेची भीतीच उरली नाही. त्यांच्या घाबरवण्याला लोक बळी पडतात. राजकारण करणाºयांना ते त्यांची जागा दाखवीत नाहीत, तोपर्यंत विकास, प्रगती होऊ शकत नाही. व्हिजन दाखविण्यापेक्षा डोळे उघडून पाहा, कानावरचे हात काढा, असा सल्ला राज ठाकरेंनी उपस्थितांना दिला.
शहरातील कचराकोंडी, खड्डेमय रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून निराशा झाल्याने कार्यक्रमातून औरंगाबादचे व्हिजन मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु फार काही साध्य झाले नसल्याने निराशा झाल्याचा सूर कार्यक्रमास निमंत्रित केलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला.
अजिंठा-वेरूळ लेणींसारखे वैभव
परदेशांत छोट्या-छोट्या शिल्पांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणींसारखे वैभव राज्यात औरंगाबादशिवाय अन्य राज्याला मिळालेले नाही. या ऐतिहासिक शहराची अशी अवस्था झालेली आहे. या लेणींमुळे जगभरातील विमाने औरंगाबादेत आली पाहिजे. या लेणी हजारो कोटी रुपये कमवून देतील; परंतु कोणालीही देणे-घेणे नसल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
स्वच्छ, सुरक्षित शहर देऊ
औरंगाबादेत नागरिकांनाच बदल घडवावा लागेल. शहराचा विकास ज्यांच्याकडून शक्य आहे, त्यांना संधी देऊन पाहा. स्वच्छ आणि सुरक्षित शहर मनसे देईल, असे संकेत औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी दिले.

महाराष्ट्रातून मुली बेपत्ता
महाराष्ट्रातून मुली पळविण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक मुली सापडत नाहीत. आई-वडील शोध घेत आहेत. मराठवाड्यातूनही मुली बेपत्ता आाहेत. त्यांचे काय झाले, याचे उत्तर नाही. यात सरकार दोषी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
माजी महापौर सुदाम सोनवणे मनसेच्या वाटेवर
माजी महापौर तथा नारायण राणेंचे कट्टर समर्थक सुदाम सोनवणे यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यावर चर्चा केली. लवकरच जाहीर कार्यक्रमात ते मनसेत प्रवेश करणार आहेत. सुदाम सोनवणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या काही पदाधिकाºयांनीही नव्या उमेदीने मनसेची वाट धरली आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौºयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांपासून या सोहळ्यातून कोण-कोण मनसेच्या वाटेवर जाणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. सिडको-हडको परिसरात राजकीय वर्तुळात सर्वाधिक सक्रिय असलेले सुदाम सोनवणे हे मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यावर अखेर शिक्कामोर्तब केले. शिवसेनेचे माजी महापौर राहिलेले सोनवणे यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते मनसेत प्रवेश करणार आहेत.
हल्ला परप्रांतीयांकडून
वाळूज एमआयडीसीतील बंददरम्यान कंपन्यांवर हल्ला करणारे हे परप्रांतीय होते. मराठा क्रांती मोर्चाचे कोणीही नव्हते. ज्या आंदोलनाला नेतृत्व नाही, त्याला बदनाम केले जात असल्याचेही ठाकरे म्हणाले.
काय करता येईल, विचार करा
गणपतीच्या वेळी शहरात पुन्हा येणार आहे. औरंगाबादसाठी काम केले जाईल. काय-काय करता येईल, सर्वांनी सुचवावे, असे राज ठाकरे कार्यक्रमात म्हणाले. त्यावर अनेकांनी पुन्हा काही नव्याने सूचना केल्या.
सनातनवरील लक्ष हटविण्याचा प्रयत्न
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामुळे सनातनवर बंदीची मागणी होत असल्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, कोणाच्या घरी शस्त्र सापडले, याचे राजकारण करता कामा नये; परंतु याचे सत्ताधारी आणि विरोधकांना राजकारण हवे. कोरेगाव-भीमाप्रकरणी कम्युनिस्टांना उचलण्यात आले; परंतु हा सगळा प्रकार सनातनवर सध्या असलेले लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ठाकरेंनी केला.
पक्षाचा कार्यक्रम नव्हता
अतुल कराड हे मला भेटायला आले होते. त्यांनी शहरासाठी बोलावे, असे म्हटले. त्यामुळे मी आल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा नव्हता. मात्र, संयोजक कोण होते आणि कोणी रसद पुरविली, हे कळू शकले नाही.

Web Title: Raj Thackeray did not show 'Vision'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.