Raj Thackeray: राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:49 PM2022-05-02T15:49:35+5:302022-05-02T15:49:42+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली.
औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी १६ अटी घालून दिल्या होत्या. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, याच्यासह आवाजाची मर्यादा देखील देण्यात आली होती.
राज ठाकरेंनी सभेत पोलिसांनी दिलेल्या १६ पैकी किती अटी पाळल्या, याबाबत आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना निखील गुप्ता म्हणाले की, सभेत किती नियम मोडले याबाबत आम्हाला अद्यात माहिती मिळाली नाही. मात्र आम्ही सर्व गोष्टींचा अभ्यास करुन पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असं निखील गुप्ता यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरेंनी घ्यायचा नाही आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करणं आणि समाजा समाजामध्ये भावना भडकतील कशा, द्वेश निर्माण होईल याचाच प्रयत्न केला. कालचं भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर काय आक्षेपार्ह आहे काय नाही याबाबत निर्णय घेतील आणि त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगतले.
दरम्यान, राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही वळसे पाटील यांनी समाचार घेतला, ते म्हणाले की, राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्याने त्यांच्यावर काही परिणाम होईल असं नाही. पवार साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यांनी नेहमी विकासाचं काम केलेलं आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचं, उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यामाध्यमातून हजारो निर्णय झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आजची समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्याला काहीच कार्यक्रम नाही ते असे आरोप करतात.