राज ठाकरे नवीन रणनितीसह भरणार पक्षात ‘जान’
By Admin | Published: November 18, 2014 12:57 AM2014-11-18T00:57:28+5:302014-11-18T01:08:29+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच नऊ मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने,
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच नऊ मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने, तसेच महापालिकेच्या २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षामध्ये ‘जान’ भरण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे महिनाअखेरीस शहरात चार दिवस तळ ठोकणार आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या २५ ते २८ या तारखांदरम्यान राज ठाकरे शहरात मुक्कामी राहणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये तशी सामसूम आहे.
राज ठाकरे यांचा दौरा आधी ९ तारखेला होणार होता; मात्र मुलीच्या अपघातामुळे हा दौरा लांबणीवर पडला. आता हा दौरा नोव्हेंबरअखेरीस होत आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यात राज ठाकरे हे पक्षाच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही भेटणार आहेत. आगामी महापालिकेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात आले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अजिबात समाधानकारक राहिली नाही. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने जिल्ह्यात एक आमदार निवडून आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांचे आठ सदस्य निवडून आले. यामुळे पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अतिशय खराब राहिल्याने कार्यकर्त्यांमध्येही नैराश्येचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी ठाकरे चार दिवस शहरात थांबणार आहेत.
मनपाची तयारी
२०१० मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला. ५३ वॉर्डांत मनसेने उमेदवार उभे केले होते; मात्र राज वानखेडे यांच्या रूपाने एक नगरसेवक महापालिकेत जाऊ शकला.
१८ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. या आशेवर आता महापालिकेत स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत पक्षाने पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते; मात्र निवडणुकीचा कार्यकर्त्यांना फारसा अनुभव नसल्याने अपयश आले. मागच्या महापालिकेचा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव कार्यकर्त्यांना असून पक्षाला महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे, असे मत पक्षाचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केले.
आता राज ठाकरे यांच्या दौऱ्यात काय रणनीती आखली जाते
याकडे कार्यकर्त्यांसह भाजपा
आणि शिवसेनेचेही लक्ष असणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्कवरील आदरांजली कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सुमारे दहा मिनिटे एकमेकांशी गप्पा मारल्या. यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची लहर आहे.
हे दोन्ही नेते भविष्यात एकत्र आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशा प्रतिक्रिया मनसेच्या गोटातून व्यक्त होत आहेत. मात्र, शिवसेनेइतकेच पदाधिकारी मनसेमध्येही काम करीत असल्याने पक्षीय पातळीवर याचाही विचार करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.
२००९ मध्ये राज्यात १३ आमदार निवडून आल्यामुळे पक्षामध्ये उत्साहाचे वारे होते. पक्षाची घसरलेली कामगिरी पाहता पक्षामध्ये ‘जान’ भरण्याचे मोठे काम राज ठाकरे यांना करावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी औरंगाबादसाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे. शहरात मागील तीन-चार वर्षांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या विविध मुद्यांवर आंदोलने करून आवाज उठविला. मात्र, तरीही पक्षाला यश मिळालेले नाही.