राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:41 AM2024-10-06T09:41:04+5:302024-10-06T09:41:46+5:30
उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी शनिवारी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मराठवाड्यातील सर्व ४६ मतदारसंघांची चाचपणी केली. यासाठी त्यांनी सकाळपासून प्रत्येक मतदारसंघाचे पदाधिकारी, निरीक्षकांशी ‘वन टू वन’ चर्चा केली. दुपारपर्यंत हा सिलसिला चालू राहिला. नंतर ते नाशिककडे रवाना झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले.
सकाळी आठ वाजताच राज ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. त्यानंतर सुभेदारी गेस्ट हाऊसवर आले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोलीतील २५-२५ पदाधिकाऱ्यांशी ते बोलत राहिले. त्या-त्या जिल्ह्यात मनसेच्या शाखा किती, इच्छुक उमेदवार कोण, इतर पक्षांचे उमेदवार कोण-कोण आहेत असा फिडबॅक त्यांनी घेतला. प्रत्येक मतदारसंघात मनसेतर्फे उमेदवार उभे केले जाणार असून, तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.
अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरे, प्रभाकर महाजन, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच स्थानिक पदाधिकारी सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, अनिकेत निल्लावार, बिपिन नाईक व आशिष सुरडकर, आदींची उपस्थिती होती.
उद्धवसेनेचे कार्यकर्ते?
उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.