राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 05:39 PM2021-12-14T17:39:47+5:302021-12-14T17:40:51+5:30
Adv. Gunaratna Sadavarte : विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे, राज ठाकरेंच्या मताला महत्व देत नाही.
औरंगाबाद : एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी एसटीचे विलानीकरण ( ST Strike ) होणार नाही असे वक्तव्य केले आहे, या त्यांच्या खाजगी मताला मी जास्त महत्व देत नाही, असा खोचक टोला अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunaratna Sadavarte ) यांनी लगावला. अॅड. सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली.
राज्य शासनात एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून संप पुकारला आहे. सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी १३ डिसेंबर हि कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची डेडलाईन दिली होती. मात्र, संप अजूनही सुरुच असून सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी कर्मचाऱ्यांची आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट घेतली. यावेळी त्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार असून आम्ही जिंकणार आहोत. आमच्यासोबत संविधान आहे, अशी ग्वाही दिली.
राज ठाकरेंची राजकारणात नव्याने सुरुवात
तसेच यावेळी अॅड. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांनी एसटीचे विलीनीकरण होऊ शकत नाही या वक्तव्याचा समाचार घेतला. विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या राजकारणाची नव्याने सुरुवात झाली असून त्यांच्या खाजगी मताला मी महत्व देत नाही, अशी खोचक टीका अॅड. सदावर्ते यांनी केली.
विलीनीकरण घेऊनच राहणार
सगळा पिटारा मी उघडणार नाही, २० डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी अॅड. सदावर्ते यांनी दिला.