पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:13 PM2022-04-22T15:13:20+5:302022-04-22T15:14:08+5:30
राज ठाकरे यांच्या सभेला विरोध नाही, चुकीच्या विचारांना विरोध असेल
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनचा खरा 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. अन् अशा पुरंदरेंचे राज ठाकरे हे सतत समर्थन करतात, हे आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना कायम मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. त्यांनी आज शहरातील पत्रकारांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांनी 'मशिदींवरील भोंगा हटाव' मोहीम सुरु केल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. सभेला विरोध आणि समर्थन दोन्ही वाढत जात असल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज ठाकरे यांनी मागील सभेत दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी महाराजांची बदनामी यावर जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला आज पत्रकार परिषदेतून विरोध दर्शवला आहे. जेम्स लेन यांचे खरे 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या पुरंदरे यांचे राज ठाकरे यांनी कायम समर्थन केले आहे. लेनला मदत करणाऱ्या डॉ. श्रीकांत भोवलकर यांची ठाकरे यांनी घरी जाऊन मागितली आहे. बदनामीच्या कटामध्ये राज ठाकरे यांचा सहभाग आहे. बदनामी करणाऱ्यांना ठाकरे यांनी त्यावेळी मदत केली आहे, आणखीही त्यांच्या बदल झाला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी महाराष्ट्राची, सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मागणी कोकाटे यांनी यावेळी केली.
सभेला विरोध नाही
राज ठाकरे यांच्या सभेला आमचा विरोध नाही. ते सातत्याने जी चुकीची मांडणी करत असतात त्याला आमचा विरोध राहील. पुरंदरेंचे समर्थन करतात यावर आमचा आक्षेप आहे, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर यापुढेही लोकशाहीमार्गाने त्यांचा विरोध करत राहू अशा इशारा कोकाटे यांनी यावेळी दिला.