राज ठाकरे यांच्याविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:40 PM2018-12-03T22:40:23+5:302018-12-03T22:40:54+5:30
परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.
औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.
मनसेने २००८ साली परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर २१ आॅक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे येत असताना बदनापूरमध्ये १० ते १५ लोकांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली. ‘राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना राज्यातून हाकला’ असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्याच्या घोषणा दिल्या. याविरुद्ध बसचालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३३६, १४३, १०९, ११४, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ३० जानेवारी २००९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. राज ठाकरे यांच्या वतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला. मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत, तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला.
ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोपपत्रास अंतरिम स्थगिती दिली होती.
याचिकेवर सोमवारी अंतिम सुनावणी झाली असता अॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१ आॅक्टोबर २००८ रोजी बदनापूरमधील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूरमधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष न्यायालयात सादर करू शकला नाही, ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठाने वरील आदेश दिला. या प्रकरणात अॅड. सागर लड्डा यांना अॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.
-------------