सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:56 PM2018-12-03T16:56:30+5:302018-12-03T16:57:13+5:30
२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते.
औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. के. एल. वडणे यांनी आज रद्द केले.
२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे परत येत असताना बदनापूर येथे १० ते १५ लोकांनी 'राज ठाकरे झिंदाबाद ' अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली तसेच 'राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना' राज्यातून हाकला असा आदेश राज ठाकरे यांनी दिला असल्याचे घोषणा दिल्या. या विरुद्ध बस चालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १०- ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादवी कलम ३३६, १४३, १०९ , ११४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विषयक कायद्याचे कलम ३ आणि 4 तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ३० जानेवारी २०९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट ( नॉन बेलेबल ) जारी केले. राज ठाकरे यांच्यावतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला.
त्याविरुद्ध ठाकरे यांनी त्यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोप पत्रास अंतरिम स्थगिती दिली होती. आज याचीकेवर अंतिम सुनावणी झाली असता अॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१/१०/२००८ रोजी बदनापूर येथील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूर मधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष नायालयात सादर करू शकला नाही ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठानेवरील आदेश दिला. या प्रकणात अॅड. सागर लड्डा यांना अॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.