शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘राज’कारणाचा उडाला धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 08:17 PM2020-02-14T20:17:16+5:302020-02-14T20:21:56+5:30
मनसे मिशन औरंगाबादबाबत महत्त्वाचे धोरण आखणार
औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद शहरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि राजमुद्रा प्रतिबिंबित भगवा ध्वज हाती घेतल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच जंगी रॅली काढून महावीर चौक ते क्रांतीचौकमार्गे गुलमंडी-औरंगपुरा ते टी.व्ही.सेंटरपर्यंत ‘राज’कारणाचा धुराळा उडविला. मनसेप्रमुख ठाकरे हे तीन दिवस येथे मुक्कामी असून, यानिमित्ताने ते मिशन औरंगाबादबाबत महत्त्वाचे धोरण आखणार आहेत.
१४ रोजी ठाकरे हे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी दिवसभर सुभेदारी विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यामध्ये संघटन, पालिका निवडणुका व इतर बाबींचा समावेश असेल. शनिवारी शहरातील महत्त्वाच्या हिंदुत्ववादी संघटना आणि एनजीओंसोबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर बैठक होईल. तसेच इंग्रजी संस्थाचालक संघटनेच्या मेळाव्याच्या उद्घाटनास ते हजर राहणार आहेत. सर्वंकष चर्चेनंतर मनपा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका ठरू शकते. १६ रोजी ठाकरे यांचा दौरा संपेल.
सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ठाकरे शहरात दाखल झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे महावीर चौक येथे जंगी स्वागत केले. तेथून पुढे क्रांती चौक, गुलमंडी, टी.व्ही. सेंटर या शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या भागातून त्यांची रॅली गेली. ठाकरे हे कारमधून हात जोडून समर्थकांचे स्वागत स्वीकारत होते. काही ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तेथे ठाकरे हे कारमधून खाली उतरले. टी.व्ही.सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून जालना रोडवरील एका हॉटेलात मुक्कामास ठाकरे आले. ठाकरे यांच्यासोबत अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, आ.राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसे, जावेद शेख, सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, भास्कर गाडेकर, बिपीन नाईक, गौतम आमराव, वैभव मिटकर, संकेत शेटे, संदीप कुलकर्णी, राज काथार यांच्यासह पक्षात प्रवेश केलेले माजी आ. हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे, प्रकाश महाजन हेदेखील रॅलीमध्ये होते. दरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या काही पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे पाकीट, मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या.
कार्यकर्त्यांच्या दंडावर ‘राज’मुद्रा
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या दंडावर ‘राज’ मुद्रेचे बॅण्ड लक्षवेधी होते. गुलमंडीत रॅली आल्यानंतर शेवटचे टोक पैठणगेटच्याही अलीकडे होते. रॅलीचा मार्ग भगव्या ध्वजांनी न्हाऊन निघाला होता. ठाकरे यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गळ्यात भगवे रुमाल, भगवे झेंडे आणि फेटे आणि दंडावर बॅण्ड लावून ठाकरे यांच्या रॅलीत समर्थक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.