‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’; अन्... एका वाक्याने केला राजन शिंदे यांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 07:44 PM2022-01-24T19:44:23+5:302022-01-24T19:45:46+5:30
Rajan Shinde murder case: दोषारोपपत्रातून माहिती उघड, पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या (Rajan Shinde murder case) हत्येला केवळ एक तात्कालिक वाक्य कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’ असा दम डॉ. शिंदे यांनी बाल निरीक्षणगृहातील अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकास (विसंबा) दिल्यानंतर ते आपल्याला मारतील. या भीतीपोटीच हे कृत्य केल्याची कबुली 'विसंबा'ने पोलीस चौकशीत दिली. या माहितीचा समावेश पोलिसांनी बाल न्यायमंडळासमोर सादर केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे. याशिवाय पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आलेला आहे.
मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शिंदे यांचा १० ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री एन २, सिडको येथील राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे समाजात खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनाही खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान होते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अविनाश आघाव यांना विविध पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठव्या दिवशी खुनाचा उलगडा करण्यात यश मिळाले. या प्रकरणात १७ वर्षे ८ महिन्याच्या एका 'विसंबा'ला ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यामुळे 'विसंबा'ला 'जुवेनाईल जस्टीस केअर ॲण्ड प्रोटेक्शन रुल्स' (जेजे ॲक्ट) या कायद्यातील विविध तरतुदीनुसार प्रौढ समजण्यात येऊन खटला सत्र न्यायालयासमोर चालविण्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली.
पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार पूर्वीपासून विसंवाद असलेल्या 'विसंबा'सोबत घटनेच्या दोन तासांपूर्वी शिंदे यांचे वाद झाले होते. त्यावेळी शिंदे यांनी त्यास ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील' असे रागाच्या भरात म्हटले. त्यामुळे ते आपल्याला मारतील या भीतीपोटी दोन तासांनी शिंदे गाढ झोपेत असताना पहाटे २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान व्यायामाचे वजनदार डंबेल पाच वेळा पाठीमागून डोक्यावर जोरात मारले. त्यानंतर चाकूने त्यांचा गळा कापून डंबेलने कपाळ, कान, डोळ्याजवळ, चेहरा व मानेवर वार करुन, खोलवर गळा व दोन्ही हाताच्या नसा कापल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
टीओआर' वेब ब्राऊझरचा वापर
शिंदे यांचा खून करण्यापूर्वी 'विसंबा'ने गुन्हा करण्याची पूर्वतयारी केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. गुन्ह्यासाठी त्याने ओटीटी प्लॅटफाॅर्मद्वारे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर मर्डर मिस्ट्री, व्हायलेट, ॲक्शन असे मर्डर रिलेटेड क्राईम चित्रपट, वेबसिरीज पाहिल्या. त्यामध्ये इ गुड डॉक्टर, सेन्टीपेडे मुव्हीज, सेक्स एज्युकेशन, कार्स, डेमोन स्लायेर, जुजुत्सा कैसनचा समावेश आहे. तो मर्डर, हॉरर कथा असलेल्या कादंबऱ्या वाचायचा, असेही दोषारोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय वेगवेगळ्या वेब ब्राउझरद्वारे खून कसा करायचा, पुरावे कसे नष्ट करावे याविषयी सर्च केल्याचे तपासात समोर आले. खून कसा करायचा, शरीरातील कोणत्या भागावर वार कसा करायचा याचीही माहिती 'विसंबा'ने अवगत करून घेतली होती. सर्च केलेली ही माहिती पोलिसांना मिळू नये याकरिता 'डार्क वेब'साठी लागणारे 'टीओआर' हे वेब ब्राऊझर वापरल्याचे तपासात समोर आले.
अन् त्याने रडून मिठी मारली
शिंदे यांच्या खुनाची कबुली 'विसंबा'ने अतिशय जवळच्या नातेवाइकांसमोर दिली. हे सर्व कृत्य आपण केले असल्याचे सांगताना रडू आल्याने त्याने नातेवाइकास मिठी मारल्याचेही दोषारोपपत्रात म्हटले आहे. हा सर्व कबुलीजबाब पोलिसांनी इन कॅमेरा नोंदवला आहे. त्याशिवाय नातेवाइकांनीही 'विसंबा' आणि शिंदे यांच्यातील अनेक वर्षांपासून असलेल्या विसंवादाची कबुली दिली. शिक्षण आणि करिअर बनविण्याच्या कारणातून वाद विकोपाला गेले होते. त्यातून असुया निर्माण झाली होती. घटनेच्या दिवशी या सर्व साचलेल्या रागातून एक वाक्य तात्कालिक कारण ठरले अन् शिंदे यांना जीव गमवावा लागल्याचे दोषारोपपत्रातून स्पष्ट होत आहे.