राजस्थान विद्यापीठाच्या तोतया अधिकाऱ्याने संस्थाचालकाला ४४ लाखाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:12 PM2018-12-21T16:12:10+5:302018-12-21T16:15:54+5:30
राजस्थानातील विद्यापीठाच्या बोगस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : एका शिक्षणसंस्थेच्या २२ विद्यार्थ्यांना डी. फार्मसीत प्रवेश देण्याच्या नावाखाली संस्थाचालकाला ४४ लाखाला चुना लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. याविषयी राजस्थानातील विद्यापीठाच्या बोगस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आझाद चौक, टीव्ही सेंटर रोड येथील रहिवासी मोहम्मद आसेफ मोहम्मद निजाम कुरैशी यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बजरंग चौक सिडको एन-८ येथे त्यांचे एटीआर नावाने शिक्षणसंस्थेचे महाविद्यालय असून, त्यात १५० विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. संस्थेमार्फत विविध कोर्स चालविले जातात. २३ डिसेंबर २०१५ ला आसेफ कुरैशी संस्थेच्या कामानिमित्त राजस्थानातील ओपीजेएस विद्यापीठात गेले. तेथे विविध अभ्यासक्रमांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तेथे मोहित सोनी हा व्यक्तीदेखील उपस्थित होता. तो स्वत:ला विद्यापीठाचा अधिकारी सांगत होता. डी. फार्मसी कोर्ससाठी फीसची माहिती विचारली असता, प्रती विद्यार्थी २ लाख ५० हजार रुपये लागतील, असे सोनी यांनी बाहेर येऊन कुरैशी यांना सांगितले. त्यावेळी सोनी याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबरदेखील घेतला होता.
२ जानेवारी २०१६ ला दुपारी १२ वाजता कुरैशी सिडकोतील कार्यालयात बसले असताना सोनी याने फोन करून विचारले की, मी औरंगाबादला आलो आहे. डी.फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या २२ विद्यार्थ्यांसोबत कुरैशी यांनी सोनीची ओळख करून दिली. प्रवेशासाठी प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे ठरले. कुरैशी यांनी ३ लाख रुपये रोख दिले. तुम्हाला उर्वरित ४१ लाख रुपये राजस्थानला घेऊन येणे शक्य होणार नाही तेव्हा बँक खात्यावर पैसे टाकण्याचा सल्लादेखील या बनावट अधिकाऱ्याने दिला.
थोडे थोडे करून विद्यार्थ्यांनी पैसे त्याच्या खात्यात जमा केले. परंतु अद्यापही विद्यार्थ्यांना डी. फार्मसीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे फोनवरून विचारपूस केली असता सोनी टाळाटाळ करू लागला. शेवटी आसेफ कुरैशी यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून ४४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. सिडको पोलीस ठाण्याचे फौजदार भारत पाचोळे पुढील तपास करीत आहेत.